मागच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांना 68 हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते. तर, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाळासाहेब आजबे यांच्याकडून भाजपच्या भिमराव धोंडे यांचा 25 हजार मतांनी पराभवाचा चमत्कार घडला होता. त्यावेळी सुरेश धस लातूर – उस्मानाबाद – बीड स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपकडून विधान परिषदेचे आमदार होते. धस तीन जिल्ह्याचे आमदार असतानाही त्यांची सुरुवातीपासूनची तयारी आणि लक्ष्य आष्टी – पाटोदा – शिरुर कासार या तीन तालुक्यांचा मतदार संघ असलेल्या आष्टीवरच होते.
दरम्यान, मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सहभागी झाल्यापासून या मतदारसंघातून विधानसभेला उमेदवारी कोणाला असा पेच आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आणि नेत्यांकडून तयारीला जोर आला आहे. ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला उमेदवारी असा सर्वसाधारण फॉर्म्युला ठरला आणि तो या मतदार संघात पाळला गेला तर बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी भेटू शकेल. त्या दृष्टीने आजबे तयारीही करत आहेत. महिनाभरापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आष्टीत त्यांनी जनसन्मान यात्राही घेतली. आताही कामांची उद॒घाटने, भूमिपुजने आणि आढाव्यांच्या माध्यमातून त्यांची तयारी सुुरु आहे. तसेच आपणच उमेदवार म्हणून ते मतदार संघात संपकरॊही करत आहेत.
माजी आमदार सुरेश धस यांचीही विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे. मतदारसंघातील दौरे, बुथ प्रमुखांचे मेळावे आणि नुकताच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतील मोठा निर्धार मेळावा घेत त्यांनी आता रिंगणात आपण असणारच असे थेट जाहीर केले आहे. धसांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची घनिष्ठता आणि पक्षातील राबता आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यासोबतचा संपर्क पाहता आष्टीची जागा राष्ट्रवादीऐवजी भाजपला सुटुन सुरेश धस यांना उमेदवारी मिळेल, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. सुरेश धसांनी तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे मंत्री असा त्यांचा चढता राजकीय आलेख राहीलेला आहे.
भिमराव धोंडे यांचेही विधानसभा निवडणुकीच्या तयारीचे दौरे सुरुच आहेत. त्यांनीही मागच्या महिन्यात राज्यस्तरीय कृषी महोत्सवातून निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. समाजाच्या मतांचा गठ्ठा आणि संस्थांचे जाळे या त्यांच्याही जमेच्या बाजू मानल्या जातात. चार वेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिमराव धोंडे यांचीही भाजपकडून उमेदवारीसाठी दावेदारी आहे. वेळप्रसंगी ते वेगळा पर्यायही निवडु शकतात. मात्र, त्यांची तयारी पाहता तेही यावेळी रिंगणाच्या बाहेर राहतील, असे चित्र नाही. त्यामुळे उमेदवारी कोणालाही असली तरी महायुतीमधील आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार सुरेश धस व माजी आमदार भिमराव धोंडे रिंगणात असतीलच असे मानले जाते.