नवी दिल्ली |
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद आजमावून पाहतो आहे. अशातच पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हाचा वाद रंगताना दिसतो आहे. निवडणुकांच्या आधीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळाशिवाय दुसरे कोणतेही निवडणूक चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक – अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे आधीपासून चिन्ह असलेल्या घड्याळाच्या वापराविरोधात पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाला हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात यावेत, असे सांगणारी एक याचिका शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे. या प्रकरणी 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
आपल्या याचिकेत शरद पवारांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, तेव्हा मतदारांसाठी हे फार गोंधळाचे ठरले होते. यामुळेच अजित पवारांच्या पक्षाला नवीन चिन्ह देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाला देण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवारांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करत राष्ट्रवादी पक्षात फूट पाडली होती. आणि ते सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह देण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकांच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ चिन्ह वापरण्यावर बंदी घातली होती. तसेच हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.
शरद पवार यांनी काँग्रेसमधून वेगळे होत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती. त्यांनी घड्याळ हे चिन्ह निवडले होते. मात्र, त्यानंतर गेल्या वर्षी या पक्षात फूट पडली आणि अजित पवार आपल्या काही आमदारांसह पक्षाबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाने देखील त्यांना हे नाव आणि चिन्ह बहाल केले. दरम्यान, 19 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष म्हणून मान्यता दिली. तसेच तुतारी फुंकणारा माणूस हे त्यांना चिन्ह म्हणून देण्यात आले.