बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली. या ठिकाणाहून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा बांधवांना संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा इशारा दिला.
“आपण 288 मतदारसंघात घोंगडी बैठक घेणार आहोत. इथे बैठका आहेत, पण सभा होत आहेत. घोंगडी बैठकीला देखील ग्राउंड लागत आहे. आता ही आरपारची लढाई आहे. किती ही आडवे येऊ द्या. आता थांबत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आमदार उभे केले. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांना त्यांची संपत्ती सांभाळायची आहे. फडणवीस साहेब, मराठे आता तुम्हाला लोळवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर तुमचे 113 आमदार घरी गेले म्हणून समजा”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. “गोरगरीब मराठ्यांनी जागे व्हावं. मार खायची वेळ आली तर खा, केस झाली तर होऊद्या. पण मागे हटू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा कार्यकर्त्यांना केलं.
“सगळं देवेंद्र फडणीवस यांच्या हातात आहे. बीडची तऱ्हा न्यारी आहे. बीडने राईट पाडापाडी केली. आधी जात किंवा जनतेला नंतर पक्ष, 15 एक वर्ष तरी यांना विधानसभा पुढे ढकलाव्या लागणार आहेत”, असा टोला मनोज जरांगे यांनी लागवला. “अशी संधी पुन्हा नाही. याचं सोनं करा. मागे हटू नका. आपले असून आपल्या विरोधात उमटले आहेत. तुमचे लेकरं तुमच्या हाताने बरबाद होऊ देऊ नका. स्वत:चे लेकरं आणि स्वतःची जात आता वाचवा. भाजपातल्या मराठ्यांना त्यांचे लेकरं प्रश्न विचारणार आहेत. बाबा तुम्ही ज्या पक्षात काम करताय त्या पक्षाचे नेते मला आरक्षण देत नाहीत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन
“हे लोक निवडून गेले की पुन्हा येत नाहीत. त्यामुळे आता विसरू नका. इथेच जर मैदान भरलं, एका एकाच दहा-दहा, वीस-वीस मतदान आहे, खाली काय राहील? पडलं ना सरकार? पूर्वी शेतकरी हा घोंगडी वापरत होता. शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी या बैठका आहेत”, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. “माझ्या विरोधात खूप जण उठले आहेत. दर आठवड्याला आमदार बदलत आहेत, नगरला कसे बैल बदलत आहेत, तसं आमदार बदलत आहेत. हे दोन-तीन महिने सावध राहा. बेसावध राहू नका. उद्यापासून एक काम करा. गावात मराठा सेवकांची टीम करा. यातून मराठा समाजाचे प्रश्न सोडवा. गरीब मराठ्यांना काम पडलं तर त्याने ते सांगायचं कोणाला? म्हणून हक्काचा मराठा सेवक अशी टीम करा. यांच्याकडून झालं नाही तर तालुक्याच्या ठिकाणावर होईल, तिथं नाही झालं तर जिह्यालाच्या ठिकाणी होईल”, असं जरांगे म्हणाले.
“या 20 मराठा सेवकांनी सगळ्याची काम करायची, कोणत्याही पक्षाच्या मराठ्यांचं काम असेल तर ते केलं पाहिजे, असे लोक टीममध्ये घ्या. एका गावात किमान 20 मराठा सेवक पाहिजे, मग ते 100 झाले तरी चालतील. उद्यापासून टीम तयार करा, जी फक्त मराठा समाजाचे दुःख आणि सुख वाटून घेईल. ज्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अन्याय झाला, गुन्हे दाखल झाले त्यांना पण घ्या. 20 सप्टेंबर पर्यंत हे करा, त्या नंतर घोगंडी बैठकीची तारीख देणार आहे. गावोगावी बैठक घ्या. सगळ्यांना निरोप द्या. सगळया टीममध्ये घ्या. आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी याची गरज आहे. ज्या जिल्ह्यात ह्या टीम तयार होतील त्याच जिल्ह्यात या पुढे तारीख दिली जाईल”, असं मनोज जरांगे म्हणाले.