आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार द्यायचा यासंबंधीची चाचपणी सुरू झाली आहे. यादरम्यान राजकीय पक्षातील अंतर्गत वाद उफाळून येताना दिसत आहेत. यादरम्यान बीड जिल्ह्यातील आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये जागवाटप होणार आहे. यादरम्यान अजित पवार गटाच्या आमदाराचे मतदारसंघात काम कमी आहे. त्यामुळे मी महायुतीचा दावेदार आहे. जर तिकीट मिळाले नाही, तर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं विधान भीमराव धोंडे यांनी केले आहे. भाजपचे नेते धोंडे हे बीडच्या आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून त्यांच्या या घोषणेमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आष्टी मतदारसंघात गतवेळी मला एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. त्यामुळे यावेळी मीच उमेदवारीचा दावेदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदारांना मतदारसंघात प्रतिसाद कमी आहे. अशा स्थितीत आम्ही गप्प बसलो तर महाविकास आघाडीला याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही मतदारसंघात संपर्क दौरे करत आहोत. विद्यमान आमदारांनी विकासकामे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना फार काही जमले नाही, असेही भीमराव धोंडे म्हणाले आहेत. साम टीव्हीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
धोंडे यांच्या या विधानामुळे विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघात उमेदवारीबद्दल चुरस निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे महायुतीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या चर्चांदरम्यान भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरे करण्यासा सुरूवात केली आहे. या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात भाजपाकडून उमेदवारीसाठी दावा देखील ठोकला आहे. आता भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते काय निर्णय घेतात ते पहावे लागणार आहे.