बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेतील (डीएमसीएसएल) शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मनी लाँडरिंग प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील पथकाने राज्यातील बीड, औरंगाबाद, पुणे, नवी मुंबई येथील कार्यालयांवर छापे टाकले. ‘ईडी’ने या शोध मोहिमेत जंगम मालमत्ता, कागदपत्रे, संगणकांसह सुमारे एक कोटी २० लाखांचा एवज जप्त केला आहे.
ईडीने ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतर संचालकांविरुद्ध गुंतवणूकदारांची फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले आहेत. आजपर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार गुंतवणूकदारांची सुमारे १६८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.
ज्ञानराधा पतसंस्थेचे व्यवस्थापन सुरेश कुटे, यशवंत कुलकर्णी आणि इतर संचालकांकडे होते. त्यांनी वैयक्तिक कर्ज, साधे कर्ज, वेतन कर्ज, मुदत कर्ज, सुवर्ण कर्ज अशा विविध योजना राबविल्या. त्यांनी विविध ठेव योजनांवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ज्ञानराधा पतसंस्थेत शेकडो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.
वैयक्तिक फायद्यासाठी बोगस शेल कंपन्यांचे जाळे
सुरेश कुटे आणि व्यवस्थापनाने ठेवीदारांकडून जमा केलेल्या ठेवींचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला. ‘डीएमसीएसएल’मधील ठेवीदारांची रक्कम इतर उद्योगात आणि ‘कुटे ग्रुप’ मध्ये गुंतवणूक केली. बोगस शेल कंपन्यांचे जाळे तयार करून मनी लाँडरिंगद्वारे हाँगकाँगला पैसे पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.