मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राज ठाकरे यांची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलबाहेर दाखल होताच तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. आंदोलकानी राज ठाकरे यांचा ताफा अडवत, राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या.
यावेळी मनसे कार्यकर्ते आणि ठाकरे सैनिकांत मोठा गोंधळ झाला. कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत कार्यकर्तांना समजावून सांगत, कार्यकर्त्यांना शांत केले.
”लोकसभेला सुपारी घेतली होती, आता विधानसभेला कोणाची सुपारी घेऊन तुम्ही आलाय. मनोज जरांगे पाटलांचा सुंदर आंदोलन सुरू आहे, त्यास तुम्ही विरोध करता. त्यामुळे, तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात हे विचारण्यासाठी आम्ही इथं आलोय,” असे बीड जिल्हा शिवसेना अध्यक्ष गणेश वरेकर यांनी सांगितलं.
तसेच, चले जाव, सुपारी बहाद्दर चले जाव, अशी आमची घोषणा असल्याचंही वरेकर यांनी म्हटलं. तसेच, एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाही यावेळी शिवसैनिकानी केली.