ठाणे |
कधी-कधी गंमतीने सांगतो की, एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन आणल्यावर मुख्यमंत्री करणार असे सांगतले. तसे मलाही सांगितले असते तर, अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याबाबतच्या भावना व्यक्त केल्या. शेवटी नशीबात असते तेच होते, आपण केवळ काम करत रहायचे असते, असेही ते म्हणाले.
प्राध्यापक प्रदिप ढवळ लिखीत योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई यांच्यासह आमदार, खासदार आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री पदाची संधी हुकल्याची खंतही यावेळी व्यक्त केली. तसेच कोपरखळ्याही लगावल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १९९९ साली तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २००४ साली आमदार झाले. या दोघांच्या आधी मी आमदार झालो पण, ते माझ्या मागून येऊन पुढे गेले, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. कधी कधी मी गंमतीमध्ये सांगतो की, एकनाथ शिंदे यांना आमदार घेऊन आणल्यावर मुख्यमंत्री करणार असे सांगतले. तसे मला सांगितले असते तर, अख्खा पक्षच घेऊन आलो असतो, असेही ते म्हणाले. मी बराच वर्षे सत्ताधारी पक्षासोबत काम केले आहे. राज्यात अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण, एकनाथ शिंदे यांच्या सारखा नागरिकांमध्ये मिसळून राहणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. सगळ्यात जास्त नागरिकांच्या अर्जावर स्वाक्षरी करणारा मुख्यमंत्री कोणी असेल तर ते म्हणजे एकनाथ शिंदे, असे कौतुकही त्यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे गावी जाऊन शेती करतात आणि त्याचे अनेकदा छायाचित्र येतात. मीही माझ्या शेतात सकाळी जातो. पण, प्रसार माध्यामांमध्ये शिंदे यांच्यासारखे मित्र नसल्याने माझे फोटो येत नाहीत, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. शिंदे यांचे दरे गाव हे जावळी तालुक्यात नसून ते महाबळेश्वर तालुक्यात आहे. तसेच या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो हवा होता. शिवाय, नाताविषयी शिंदे यांचे विशेष प्रेम असून त्याचा एका परिच्छेतात उल्लेख करण्यात आला आहे. तो अधिक विस्तृत असायला हवा, अशा पुस्तकातील त्रुटींवर अजित पवार यांनी बोट ठेवत मंत्री उदय सामंत यांच्याऐवजी मला विचारले असते तर मी अधिक सांगू शकलो असतो, असा सल्ला पवार यांनी लेखकाला दिला. उदय सामंत, दिपक केसरकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे हे सर्वजण माझे सहकारी होते. पण, त्यांना शिंदे यांनी आपल्या पक्षात घेतले आणि त्यानंतर मलाही त्यांच्यासोबत सत्तेत घेतले, असेही ते म्हणाले.