बीड |
वैद्यकीय पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात ‘नीट’साठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज नोंदणी आणि शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत 6 एप्रिल आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण (एनटीए) यांच्यामार्फत देशभरात “नीट’ ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक “एनटीए’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमबीबीएससह आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी या भारतीय वैद्यक पद्धतीतील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट आवश्यक आहे. तसेच लष्करी नर्सिंग सेवेअंतर्गत लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात राबवल्या जाणाऱ्या बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठीही “नीट’ अनिवार्य आहे. एकूण तेरा भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा होईल. यात मराठी भाषेचा समावेश आहे.
“नीट’चे वेळापत्रक
अर्जाची मुदत : 6 एप्रिल
परीक्षा : 7 मे रोजी
परीक्षेचा कालावधी : 3 तास 20 मिनिटे
परीक्षेची वेळ : दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटे
अर्ज भरताना सूचना…
उमेदवारांनी अर्जातील ई- मेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक स्वतःचा किंवा पालकांचा असेल याची दक्षता घ्यावी. ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र, पासपोर्ट यापैकी दोन कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे. सविस्तर माहिती “एनटीए’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.