अजित पवार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना बीडमध्ये पक्षाच्या नेत्याने राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा आमदार प्रकाश सोळंके यांनी केली असून, त्यांनी त्यांचा राजकीय वारसदारही जाहीर केला आहे.
लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. अशातच प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.
प्रकाश सोळंके लढवणार नाही निवडणूक
माजलगावचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अचानक राजकीय निवृत्तीची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सोळंके यांनी जाहीर केले.
एकीकडे प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली, तर दुसरीकडे त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, याचीही घोषणा केली. प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे.
प्रकाश सोळंकेंचे मतदारसंघात दौरे
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश सोळंके यांनी माजलगाव मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. दौरा करत असतानाच त्यांनी एका गावात राजकीय निवृत्ती आणि वारसदाराच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून जयसिंह सोळंके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार हे स्पष्ट झाले आहे.
जयसिंह सोळंके कोण आहेत?
आमदार प्रकाश सोळंके यांनी जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके यांचे धाकटे बंधू धैर्यशील सोळंके यांचे सुपुत्र आहेत. जयसिंह सोळंके हे धारूर पंचायत समितीचे उपसभापति राहिलेले आहेत.
बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही जयसिंह सोळंके यांनी काम केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. राजकारणात सक्रीय असलेल्या जयसिंह सोळंके यांना आता विधानसभा निवडणुकीची संधी मिळणार आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.