लोकसभा निवडणुकीत फारसा चांगला परफॉर्मन्स दाखवू न शकलेल्या अजितदादांनी आता राजकीय शहाणपणा दाखवून विधानसभेच्या महायुतीच्या जागावाटपात एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले आहे. महायुतीच्या घटक पक्षांशी जागावाटपाच्या वाटाघाटीत वाद घालत बसण्यापेक्षा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते टिकवून ठेवण्यावरच भर दिला पाहिजे, याची जाणीव अजितदादांना झाली असल्याची बातमी आहे.
राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्षांची मोठी पीछेहाट झाली. या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही सत्ताधारी पक्षांनी राज्यभर जोरकस प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या महायुतीबाबत सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे जागावाटप. यासंदर्भात नेमका फॉर्म्युला कधी ठरणार व जाहीर कधी होणार? याविषयी तर्क-वितर्क सुरू असताना अजित पवारांनी त्याबाबत भाष्य केले. महाराष्ट्रात कुणालाच स्वबळावर सत्ता मिळणं अशक्य असल्याचं ते म्हणाले आहेत.
आज महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय स्थिती पाहाता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ महाराष्ट्रात दिसत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जागावाटपात विद्यमान जागा ज्यांच्याकडे आहेत, त्या जागा त्यांच्याकडेच राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली आहे. पण काही विद्यमान जागादेखील एकमेकांना दिल्या जाण्याची शक्यता आहे. तिघांमध्ये एकमत होऊन एखादी जागा समजा ‘अ’ पक्षानं सोडली आणि ‘ब’ पक्षानं स्वीकारली, तर त्याबदल्यात ‘ब’ पक्षानंदेखील एक जागा ‘अ’ पक्षासाठी सोडली पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले. जर एखाद्या पक्षाकडे असणाऱ्या उमेदवारापेक्षा मित्रपक्षाकडे असणारा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता जास्त असेल, तर ते करण्याची मानसिकता सगळ्यांनी दाखवली आहे. पण त्याला अजून अंतिम स्वरूप यायचं आहे, असे अजित पवारांनी सांगितले.
एक पाऊल मागे का??
असे असले तरी अजितदादांनी जागावाटपात एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले आहे. महायुतीत 75 जागा मागायच्या आणि 60 ते 65 जागांवर तडजोड करायची, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. याचे सगळ्यात महत्वाचे कारण असे की, महायुतीचे जागावाटप हे अजितदादांसमोर खरे आव्हानच नाही. खरे आव्हान आहे, ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते आणि आमदार टिकवून धरण्याचे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आमदारांच्या गळतीची अजितदादांना खरी भीती आहे. ज्या आमदारांच्या तिकीटांसाठी महायुतीच्या नेत्यांशी भांडायचे, ते आमदार आणि नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टिकणार नसतील, तर उपयोग काय!!, याची जाणीव अजितदादांना झाली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपली मर्यादित ताकद ओळखून त्यांनी महायुतीच्या जागावाटपाच्या पेचात एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले असल्याची बातमी आहे.