स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमांसोबतच केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशवासीयांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा आणि राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी प्रसिद्ध करावी, असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले.
गृहमंत्री शहा यांनी आवाहन केले, की हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) मोहिमेअंतर्गत ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपापल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा आणि https://harghartiranga.com या संकेतस्थळावर आपला सेल्फी अपलोड करावा. आपला राष्ट्रीयध्वज तिरंगा त्याग, निष्ठा आणि आणि शांततेचे प्रतिक आहे. घरोघरी तिरंगा मोहीम ही स्वातंत्र्यलढ्याच्या नायकांचे स्मरण करण्याचे, सर्वप्रथम देश हा संकल्प घेण्याचे आणि राष्ट्रीय एकतेला प्रोत्साहन देण्याचे माध्यम बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनानंतर हे आवाहन मागील दोन वर्षांपासून जनआंदोलन बनले असल्याचेही शहा यांनी म्हटले आहे.
अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या रेडिओ संवाद कार्यक्रमामध्ये १५ ऑगस्टला घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याच्या मोहिमेचे सूतोवाच केले होते. तसेच देशभरातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले होते. त्यापार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार घरोघरी तिरंगा ध्वज लावण्याच्या मोहिमेच्या घोषणेनंतर देशभरात २० कोटीहून अधिक ध्वज उपलब्ध करण्यात आले आहेत तर, सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फेही ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक घरावर, दुकानावर, कार्यालयांवर तिरंगा ध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.