महसूल विभागातील तलाठी, मंडल अधिकारी, कारकून, अव्वल कारकून आदी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे या बदल्या रखडल्या होत्या. मात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास मंजुरी दिली असून, येत्या १५ ऑगस्टपर्यंत या बदल्या करण्यात याव्यात, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
याबाबतचे पत्र महसूल विभागातील कक्ष अधिकारी स. र. दळवी यांनी काढले आहेत. लोकसभा निवडणुका राज्यात एप्रिल-मे महिन्यात पार पडल्या. तर, मतमोजणी ४ जून रोजी निवडणुकांमुळे राज्यातील महसूल विभागातील गट ब, गट क, गट-ड या संवर्गाच्या सर्वसाधारण बदल्या एप्रिल-मे महिन्यात झाल्या नाहीत. तसेच पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्या करायच्या की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यावर सर्व जिल्ह्यांमधून शासनाकडे विचारणा होत होती. अखेर शासनाने या बदल्या करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांत या बदल्या पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.