नाशिक |
रोजच्या जेवणात अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या टोमॅटोचे दर देशाच्या विविध भागात १०० रुपयांवर गेल्याने घराघरातील स्वयंपाकाचे बजेट कोलमडले आहे. यंदा महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळात मोठ्याप्रमाणात उष्णतेची लाट पसरली. त्यामुळे टोमॅटोच्या पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातही टोमॅटो १०० ते ११० रुपये किलोने विकले जात आहेत.
दिल्लीच्या ‘सफल’ स्टोअरमध्ये टोमॅटो १०० रुपये किलोने विकला जात आहे. तर केंद्रीय ग्राहक खात्याच्या माहितीनुसार, दिल्लीत किरकोळ बाजारात टोमॅटो १०५ रुपये किलोने विकला जात आहे.
यंदा पाऊस वेळेवर आला, मात्र नाशिक जिल्ह्यात लागवडीलायक पाऊस झालेला नसल्यामुळे टोमॅटो लागवडीस उशीर झाला. त्यामुळे नवीन टोमॅटो बाजारात येण्यास एक महिना लागणार आहे. सद्य:स्थितीत बाजार समित्यांमध्ये उन्हाळ्यात लागवड झालेले टोमॅटो पीक विक्रीस येत आहे. हवामान बदलाची झळ टोमॅटोला बसली असून, उन्हाळ्यात काही दिवस तापमानवाढीमुळे वातावरणात झालेला बदल आणि पाणीटंचाईचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. या संकटावर मात करून वाचलेल्या टोमॅटो पिकाला नंतर अवकाळी पावसाची झळ बसली. परिणामी बाजारात आवक कमी होत असल्यामुळे टोमॅटोच्या बाजारभावात तेजी आलेली दिसून येत आहे.
दरवर्षी एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये टोमॅटोच्या पिकास चांगला भाव मिळतो. महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या प्रमुख राज्यांसह अन्यत्र देखील हे पीक घेतले जाते. महाराष्ट्रातील टोमॅटोला देशांतर्गत तसेच परदेशातही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. टोमॅटोला चांगला भाव मिळाल्यास द्राक्ष उत्पादनासाठी येणारा खर्च काही प्रमाणात यातून भरून निघतो. त्यामुळे हे पीक सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून बागायतदार शेतकरीही घेतात. मे ते जूनदरम्यान पुणे तसेच नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा तालुक्यातील काही भागात टोमॅटोचे पीक घेतले जाते. जून ते ऑगस्टपर्यंत सातारा, सांगली, कोरेगाव या परिसरात टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते. या टोमॅटोला प्रति कॅरेट दर १ हजार ते १२०० रुपये झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकाला १०० ते १२० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो घ्यावा लागत आहे. जून महिन्यामध्ये बेंगळुरूतून टोमॅटो येत असतो, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी तेथील टोमॅटो उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. ऑगस्टपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व हिवरगावचा टोमॅटो बाजारात येतो. १५ ऑगस्टपासून पिंपळगाव तसेच चांदवड तालुक्यातील पूर्व भागातील टोमॅटो बाजारात येतो. याच कालावधीत नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो हे सप्टेंबरपासून तसेच दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातूनही टोमॅटो बाजारात विक्रीस येतात. गेल्यावर्षी टोमॅटोच्या प्रचंड उत्पादनामुळे भाव घसरले होते. वाहतूक खर्चही भरून निघणे कठीण झाले होते. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना मालाची विक्री न करता फेकून देण्याची वेळ आली होती. सध्या कमी आवकमुळे टोमॅटोला भाव असल्याने शेतकरी समाधानी आहे. रविवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला ३००० ते ६००० हजार रुपये क्विंटल दर मिळाला.
टोमॅटोबरोबर इतर भाजीपाला महाग झाल्यामुळे याचा परिणाम काही प्रमाणात किरकोळ विक्रीवर होत आहे. ग्राहक मोजक्या प्रमाणात खरेदी करत असल्यामुळे विक्री कमी होत आहे. बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. स्थानिक बाजारपेठेत मालाला मागणी जास्त असल्यामुळे इतर राज्यातील पुरवठ्यात घट झाली आहे.
– साजीद काजी, व्यापारी
टोमॅटो लागवडीस उशीर
पुरेसा पाऊस नसल्यामुळे यंदा पावसाळी हंगामाच्या टोमॅटो लागवडीस उशीर झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली असून, यंदा टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत.
यंदा शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढल्यामुळे टोमॅटो लागवड यंदा कमी आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारभाव वाढलेले आहेत. आता बाजारभाव चांगला असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
– सुनील गवळी, शेतकरी