वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरविरोधात अखेर केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाईचा बडगा उगारला मात्र संपूर्ण देशात खळबळ उडालेल्या या प्रकरणाला वाचा फोडली, ती वैभव कोकाट या तरुणाने. एका ट्वीटमुळे पूजा खेडकर प्रकरण उघडकीस आले आणि त्याची देशभरात चर्चा सुरू झाली. एका ट्वीटमुळे एखाद्या आयएएस अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते, असे वैभव कोकाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेल्या पूजा खेडकर यांनी बनावट जात प्रमाणपत्र आणि अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून आयएएस रँक मिळवली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर यूपीएससीसह केंद्र आणि राज्यातील प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.
असे झाले प्रकरण उघड ….
अगदी काल-परवापर्यंत पूजा खेडकर कोण आहेत, हेही माहीत नसलेल्या वैभव यांनी हे प्रकरण कसे उघडकीस आणले, याबाबत ‘सकाळ’ला सांगितले. ते म्हणाले, पूजा यांच्या वागणुकीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल राज्य सरकारकडे पाठवला होता. एका मित्राच्या माध्यमातून तो माझ्यापर्यंत पोहोचला. उत्सुकतेपोटी मी तो वाचला असता, एक प्रशिक्षणार्थी अधिकारी एवढा माज कसा दाखवू शकतो, याबाबत मला आश्चर्य वाटले. त्यानंतर या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर ज्या ऑडी कारवर पूजा यांनी बेकायदा अंबर दिवा लावला होता, त्याचे फोटो मिळवले. हे पुरावे घेऊन पोलिसांकडे जाण्याचा पर्याय माझ्याकडे होता; मात्र या प्रकरणातील प्रशासकीय असंवेदनशीलता बघता पोलिसांकडे जाण्यापेक्षा समाजमाध्यमांवर ते पोस्ट करण्याचे मी ठरवले, असं कोकाट म्हणाला.
२६ जुलै रोजी पूजा खेडकर यांच्याबाबतची माहिती फोटोसह ‘एक्स’वर टाकली. सर्वच प्रसारमाध्यमांनी या पोस्टची दखल घेत बातम्या केल्या. अनेक सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांनी मला फोन केले. त्यानंतर पूजा यांच्यासंदर्भात एकापाठोपाठ एक गैरप्रकार उघड होऊ लागले. राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाची दखल घेताच, केंद्र व राज्य सरकार कामाला लागले, असं तो म्हणाला.
प्रोबेशनरी IAS वापरतायेत AUDI कार ?
नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लाऊन घेतला. शिवाय… pic.twitter.com/DeVq4xpRKY
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) July 6, 2024