गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर लोटल्या गेलेल्या पंकजा मुंडे यांची पु्न्हा एकदा विधिमंडळात एन्ट्री झाली आहे. पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी पंकजा मुंडे यांच्या भाळी विजयाचा गुलाल लागला आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभा आणि विधानपरिषदेची प्रत्येकी निवडणूक आली की, भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीची चर्चा व्हायची. मात्र, त्यांचे राजकीय पुनर्वसन कधीच झाले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली, पण मराठा फॅक्टरने त्यांना बालेकिल्ल्यातच पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रचंड हताश झाले होते. या सर्वांना पंकजा मुंडे यांच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयाने नवी उभारी मिळाली आहे.
विधानपरिषद निवडणुकीतील या विजयामुळे पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवाच्या कटू आठवणी एका क्षणात पुसल्या गेल्या. पहिल्या काही मिनिटांमध्येच पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित झाला. यानंतर त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाबाहेर जल्लोषाला सुरुवात केली. यावेळी आणखी एक दृश्य लक्ष वेधून घेणारे ठरले. गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा सातत्याने रंगते. मात्र, शुक्रवारी विधानपरिषदेतील विजयानंतर देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील या वादाला तिलांजली मिळाल्याचे स्पष्ट झाले.
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी झाले. यानंतर देवेंद्र फडणवीस हे विजयी मुद्रेने प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या एका बाजूला पंकजा मुंडे आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना पेढा भरवून त्यांचे अभिनंदन केले. तर पंकजा मुंडे यांनीही लगेच देवेंद्र फडणवीसांना वाकून नमस्कार केला. हे दृश्य भाजपमधील बदललेल्या परिस्थितीचे बोलके चित्र असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आता भाजप आणि महायुती ही सकारात्मक भावना आणि विजयी लय विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राखणार का, हे आगामी काळात बघावे लागेल.
कोणाला किती मतं पडली?
भाजप
पंकजा मुंडे- 26
परिणय फुके-26
अमित गोरखे- 26
सदाभाऊ खोत- 23.24
योगेश टिळेकर- 26
अजित पवार राष्ट्रवादी
शिवाजीराव गर्जे – 24
राजेश विटेकर – 23
शिवसेना- (शिंदे)
भावना गवळी – 24
कृपाल तुमाने – 25
शिवसेना (उद्धव ठाकरे)
मिलिंद नार्वेकर – 24 .16
काँग्रेस
प्रज्ञा सातव- 25
जयंत पाटील- 12.46