नवी दिल्ली |
होळीचा सण तोंडावर आला असताना, देशावर कोरोनासह आणखी एका आजाराचं संकट कोसळलंय. मागील आठवड्यात देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तीन पटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे तर, मागील काही दिवसांपासून नागरिकांमध्ये फ्लूसदृश्य आजाराची साथ पसरली आहे. हा ‘प्लूए’ या आजाराचा उपप्रकार असून ‘एच एच३ एन२’ या विषाणूमुळे होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
गेल्या २४ तासांत देशात ३२४ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २२ फेब्रुवारी रोजी ९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या ३०० होती, आज हीच रुग्ण संख्या ३२४ वर पोहोचली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमुळे देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ७९१ पर्यंत वाढली आहे.
यातच देशभरातील नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, उलट्या, अंगदुखी या आजारांना सामोरं जावं लागत आहे. ही फ्लुसारख्या नवीन आजाराची मुख्य लक्षणे असल्याचं समोर आलंय. या आजाराच्या विषाणूचा प्रसार हवेतून वाढत आहे. मुख्यत: १५ पेक्षा कमी आणि ५० पेक्षा अधिक वयाच्या रुग्णामध्ये ही लक्षणे आढळून येत आहेत. या लक्षणांनी ग्रस्त असलेले अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण वाढलंय.
कोरोनामुळे गेल्या २४ तासांत तीन रुग्णांचा मृत्यू
गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन महाराष्ट्रातील असून केरळमध्येही एक जण दगावल्याची नोंद झाली.
प्लूसदृश्य आजारात काय काळजी घ्याल
प्लूसदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी उपचार घेताना प्रतिजैवकांचा वापर करु नये. डॉक्टरांकडूनही सध्या फक्त लक्षणांवर औषधे देण्याचा सल्लाही आयएमएने दिला आहे. या आजारामध्ये साधारणपणे पाच ते सात दिवस ताप येत, तसेच खोकला तीन आठवड्यांपर्यंत राहतो, असे आयएमएने जाहिर केले आहे.