बीड |
तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे यांना बँक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजतय. बीड पोलिसांंनी पुण्यात ही कारवाई केली असून, या प्रकरणी कुटे यांच्याविरोधात विविध ठिकाणी पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलिसांंनी सुरेश कुटे यांना दुपारी 2 वाजेपर्यंत ज्ञानराधा बँकेच्या घोटाळ्यासंबंधीचे दस्तऐवज सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार कुटे यांना ठेवीदारांच्या ठेवी कसे परत करणार, आरबीआय सोबत झालेला पत्रव्यवहार इत्यादी कागदपत्रे पोलिसांना सादर करायची सांगितली आहेत.
बीड येथील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने 10 ऑक्टोबर 2023 रोजी धाडी टाकल्या होत्या. तिरूमला उद्योग समूहाच्या विविध पाच शहरातील कार्यालयावर या धाडी टाकण्यात आल्या होत्या. बीड, पुणे, सोलापूर, फलटण, संभाजीनगर तिरूमला उद्योग समूहाच्या कार्यालयांवर आयकर विभागाने कारवाई करत अनेक कागदपत्रे जप्त केली होती.
महाराष्ट्रामधील एक प्रमुख उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. खाद्यतेल, दुग्ध जन्य पदार्थ , हेअर ऑईल, वाहनांचे सुटे पार्ट ,पेंड उद्योगातील प्रमुख नाव म्हणून बीडचा तिरुमला ग्रुप ओळखला जातो.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 6 लाख 50 हजार ठेवीदारांचे 3 हजार कोटी रुपये अडकल्याने ठेवीदार प्रचंड आर्थिक तणावात आहेत. तात्पुरती गरज भागवावी म्हणून लोकांकडून घेतलेले देणे परत करताना ठेवीदारांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र, सुरेश कुटे यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तुम्ही माझ्या बँकेतून पैसे काढणार आहात आणि दुसऱ्या बँकेत व्याजासाठी टाकणारच आहात तर माझ्याच बँकेत पैसे राहू द्या, असं म्हणून गरजवंत ठेवीदारांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे ठेवीदार आक्रमक होत आहेत. मागील 9 महिन्यांपूर्वी कुटे यांनी दिलेल्या चेकच्या तारखा संपत आल्याने ठेवीदार आता बँकेत चेक टाकणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ज्ञानराधाच्या 51पैकी 26 शाखा बंद आहेत.