यवतमाळ |
सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एका विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी प्राध्यापकाविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विजेंद्र जाधव (४०, रा. मातोश्री नगरी, डी-मार्टच्या समोर, यवतमाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे.
विवाहित महिला घरी एकटीच असताना आरोपी विजेंद्र हा घरी आला. त्याने एक पेढा खायला दिला. तो खाल्ल्यानंतर विवाहितेला चक्कर आली व ती बेशुद्ध पडली. काही तासानंतर विवाहिता शुद्धीवर आली असता तिला विजेंद्र घरातच बसून दिसला. यावेळी त्याने ‘तू मला खूप आवडते, तू कॉलनीत आली तेव्हापासून आवडते म्हणून तुझ्या नवऱ्याशी मैत्री केली’, असे सांगितले. तसेच शारीरिक संबंध करायचे आहे म्हणून तुझे फोटो काढले, तू नकार दिला तर है फोटो नवऱ्याला दाखवेल किंवा व्हायरल करेन, अशी धमकी देत निघून गेला. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी पुन्हा घरी आला. विवाहिता एकटीच असल्याचे पाहून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र धमकीमुळे विवाहितेने ही घटना कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर पुन्हा घरी कुणी नसताना येऊन विवाहितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, २३ मार्च २०२४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास विजेंद्रने दरवाजा ठोठावला. पती घरी आले म्हणून विवाहिता दरवाजा उघडण्यासाठी गेली असता विजेंद्र अंगावर आला. त्यावेळी विवाहितेने आरडाओरड केल्यामुळे मुले जागी झाली. त्यामुळे तो पळून गेला. बदनामी होईल, या कारणामुळे विवाहितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. मात्र जानेवारी २०२४ पासून ते मार्चदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे अखेर विवाहितेने १३ मे रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.