शिक्षाणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अनेक जण आजही अंधश्रद्धेला बळी पडत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. पुण्यात वानवडी येथे घरावर काळी छाया असल्याचा बनाव करत ती उतरून देण्याच्या बहाण्याने माय लेकीला गुंगीचे औषध पाजून त्यांना विवस्त्र करत त्यांचे फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत १५ लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन मांत्रिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णनारायण तिवारी (वय ३०, रा. शक्तीनगर, गोंडा, उत्तर प्रदेश) व अंतीमा कृष्णनारायण तिवारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांत्रिकांचे नाव आहे. या प्रकारी एका २८ वर्षीय महिलेने वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२३ रोजी वानवडी रहेजा गार्डन सोसायटीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत फिर्यादी महिला आणि आरोपी यांची ओळख आहे. तक्रारदार महिलेला वारंवार दैनिदिन जीवनात अडचणी येत असल्याने त्यांच्या घरावर काळी छाया असल्याचा बनाव आरोपीने केला. यातून बाहेर काढण्याचे आमिष देखील त्यांना दाखवले. घरावरील काळी जादू नष्ट करतो, यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील अशा थापा देखील त्यांनी तक्रारदार यांना मारल्या. यासाठी घरात एक पूजा विधी करावा लागेल असे त्यांनी फिर्यादीला सांगितले. त्यांच्या भूलथापेला बळी पडून फिर्यादींयांनी घरी पूजा करण्याचे मान्य केले.
या साठी आरोपी मांत्रिक कृष्णनारायण व अंतीमा यांना दोघींनी बोलावले. दोघांनी पूजा विधी सुरू केले. हे विधी करत असतांना त्यांनी फिर्यादी महिलेला व तिच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचे कडू असलेले गुंगीचे औषध पाजले. त्यांनी देखील धार्मिक विधी म्हणून हे औषध प्यायले. यानंतर त्यांना गुंगी येऊन त्या बेशुद्ध पडल्या. याचा फायदा घेत आरोपी यांनी दोघींच्या अंगावरील कपडे काढले. या दोघींचे अंतर्वस्त्रातील फोटो काढले. यानंतर हे फोटो फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर पाठविण्यात आले. तसेच हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपीने दिली. या फोटोद्वारे त्यांनी फिर्यादीयांना ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली. गेल्या वर्ष भरात त्यांनी फिर्यादी यांच्याकडून तब्बल १५ लाख रुपये उकळले. यानंतर पैसे दिले नाही तर फिर्यादीला व तिच्या मुलीला ठार मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली.
फिर्यादीने घाबरून आरोपी यांना आरटीजीएस, फोन पे द्वारे पैसे पाठवण्यास भाग पाडले. अखेर यानंतर त्यांनी फिर्यादीच्या घरून सोने चांदी लुटल्याचा बनाव देखील रचला. अखेर हा त्रास सहन न झाल्याने त्यांनी या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. हा गुन्हा स्वारगेट पोलिसांनी वानवडी पोलीसांकडे वर्ग केला आहे.