बीड |
निवडणूक खर्चात झालेल्या तफावतीबाबत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे.
निवडणुकीच्या काळात निवडणूक खर्चाची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुसांता कुमार बिस्वास यांच्या उपस्थितीत तीनदा करण्यात आली. दि. 4, 8 मे आणि 12 मे रोजी निवडणूक खर्च तपासणी करण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये तफावत आलेल्या उमेदवारांना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. तिसरी तपासणी 12 मे रोजी पार पडली असून यामध्ये झालेल्या खर्चांमध्ये तफावत आलेल्या दोन उमेदवारांना नोटीस जारी झाली आहे.
पंकजा मुंडेंना नोटीस
पंकजा मुंडे या उमेदवाराने 24 एप्रिल ते 2 मे या कालावधीतील खर्च तफावती बाबत नोटीस देऊन खुलासा सादर करण्यास कळविले होते त्याप्रमाणे तफावत मान्य केली असून 5 लाख 95 हजार 63 एवढा खर्च निवडणूक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता.
रक्कम कमी दर्शविली
दिनांक 24 एप्रिल ते 10 मे पर्यंत खर्च 20 लाख 22 हजार 801 रुपये सादर केलेला आहे. निवडणूक निरीक्षक यांच्या कक्षाकडून कार्यालयाच्या छायांकित निरीक्षण नोंदवहीनुसार नोंदविण्यात आलेल्या याच कालावधीमध्ये 41 लाख 16 हजार 841 रक्कम दिसून आली आहे. 3 ते 10 मे या कालावधीतील छायांकित नोंदवहीनुसार झालेल्या खर्चाचा विचार करता उमेदवाराकडून 20 लाख 94 हजार 40 रुपये कमी दर्शविण्यात आलेले आहेत.
बजरंग सोनवणे यांच्या खर्चातही तफावत
बजरंग सोनवणे या उमेदवाराच्या खात्यात दिनांक 22 एप्रिल ते 2 मे या कालावधीत आलेल्या तफावतीबाबत नोटीस जारी करण्यात आले होते. उमेदवारांनी तफावत मान्य केली असून तफावतीची रक्कम 5 लाख 31 हजार 294 इतकी होती मात्र, ही रक्कम अद्याप खर्च नोंदवही मध्ये समाविष्ट करून घेतल्याचे दिसून आढळले नाही. तसेच 3 मे ते 6 मे 2024 या कालावधीतील झालेल्या खर्चातही तफावत होती. त्यासाठी, देखील नोटीस जारी करण्यात आलेली होती. ही रक्कम 4 लाख 27 हजार 937 एवढी निवडणूक खर्चात समाविष्ट करणे अपेक्षित होते परंतु ती पण रक्कम दर्शविण्यात आलेली नाही.
निवडणूक खर्च नोंदवहीत नोंद नाही
तिसऱ्या खर्च तपासणीमध्ये 7 ते 10 मे पर्यंत चा खर्च सादर केलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता पहिल्या व दुसऱ्या खर्चातील तफावती दिसून आढळल्या नाहीत. अशा प्रकारे 22 एप्रिल ते 10 मे या कालावधीमध्ये छायांकित निरीक्षक नोंदवहीशी तुलना करता 9 लाख 59 हजार 231 एवढी तफावत दिसून आली आहे. हा खर्च सदर उमेदवाराने मान्य केलेला आहे. मात्र निवडणूक खर्च नोंदवही मध्ये तशी नोंद घेतलेली नाही.
खर्च नोंदवही मधील भाग क दैनंदिन खर्च नोंदवही, भाग ख रोकड नोंदवही, व भाग ग बँक नोंदवही याप्रमाणे सर्व नोंदवह्या दैनंदिन पणे अद्यावत करण्यात याव्यात.
खर्च निरीक्षक बिस्वास यांच्या सूचना
खर्च निरीक्षक बिस्वास यांनी दिलेल्या समक्ष सुचनानुसार खर्चाची उपक्रमाणके, प्रमाणाचे सादर करणे दैनंदिन खर्चानुसार सदरील प्रमाणकांवर अनुक्रमांक दर्शविणे, खर्चाचे प्रदान हे धनादेशाद्वारेच करून त्यानुसार बँक खाते स्टेटमेंट सादर करणे. आदींचे काटपोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी खर्च तपासणी करताना दिले. तसेच यापुढे खर्च सादर करताना कसल्याही प्रकारची तफावत व उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना केल्या होत्या.
उमेदवारांच्या खाते तपासणी अंती सोमवार दिनांक 13 मे रोजी नोटीस जारी करण्यात आले असून 48 तासाच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे अन्यथा भारतीय दंड संहितेच्या कलम 171 झ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कळविले आहे.