लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलीस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलीस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले.महिला पोलीस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार केला. पतीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केले. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून पीडित महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेल्या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याप्रकरणी खडक पोलिसांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणूक असलेल्या पोलीस नाईक दीपक सिताराम मोघे या पोलीस कर्मचार्यावर आयपीसी 307, 376/2/एन, 377, 392, 506/2, 504, 323 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला आहे. याबाबत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २९४/२०२३) दिली आहे.
हा प्रकार पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर २०२० ते १ ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला. आरोपी दीपक मोघे अटक टाळण्यासाठी फरार झाला होता. त्याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याची दखल घऊन त्याला पोलीस दलातून निलंबित केले होते. आरोपीने सत्र न्यायालय, उच्च न्यायालय येथे वेळोवेळी जामीन मिळण्यासाठी अर्ज केले होते. मात्र, खडक पोलिसांनी आरोपीच्या विरोधातील पुरावे न्यायालयात सादर करुन त्याच्या जामिनाला विरोध केल्याने न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने आरोपीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.
जामीनासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने आरोपी दिपक मोघे हा 10 मे 2024 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शिवाजीनगर पुणे एन.एच.बारी यांच्या कोर्टात हजर झाला. न्यायालयाच्या आदेशावरुन आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी.आर. डोनालपल्ले यांच्या कोर्टात हजर करुन पोलीस कोठडी घेतली.
पुढील तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार करीत आहेत.