मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण न मिळाल्याने आक्रमक झालेल्या सकल मराठा समाजाने प्रत्येक मतदारसंघात ५०० पेक्षा अधिक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात तसे घडले तर काय काळजी घ्यावी, याविषयी राज्य निवडणूक आयोग यासंदर्भात विचारविनिमय करत असून, लवकरच अधिकृत सूचना जिल्हा निवडणूक विभागाला मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. १५) जिल्हा निवडणूक विभागाचा आढावा घेतला. लोकसभा मतदारसंघात ३८३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास अडचण निर्माण होणार नाही; पण त्याच्या वर उमेदवारांची संख्या पोचली तर काय उपाययोजना कराव्यात, याविषयी अधिकृत सूचना दिल्या जाणार आहेत.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार, मतदान केंद्र, मतदान केंद्रनिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्तीची माहिती जाणून घेतली. व्हीव्हीपॅट मशिनची संख्या, मतमोजणी केंद्रावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना जाणून घेतल्या.