आमदार निलेश लंके यांना समजून सांगायचे तेवढे सांगितलं आहे. आता त्यांचा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आमदार अपात्रतेचा निकष लक्षात घेता, लंके यांना अगोदर आमदार पदाचा राजीनामा द्यावा लागेल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात जाणार आणि खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहणार, अशी चर्चा रंगली आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा भाजपने उमेदराी जाहीर केल्यानंतर आता ते नक्की जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.
पवार म्हणाले की, आमदार लंके यांचे आणि नगर जिल्ह्यातील राज्यातील एका मंत्र्यांचे वाद आहेत. या संदर्भात मी लंके यांच्याशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही त्यांची चर्चा करून दिली आहे. निवडणुकीनंतर आपण पुन्हा एकदा बसू. संबंधित मंत्र्यांनाही एकत्र बोलवू. जे समज- गैरसमज आहेत, ते दूर करू, अशी माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही अशा चर्चा होता आहे. त्यामुळे जेवढे समजून सांगायचे, तेवढे सांगितले आहे.
लंकेंची लोकप्रियता पारनेरपुरतीच
पवार म्हणाले की, खरंतर निलेश हा चांगला आमदार आहे. त्यांची लोकप्रियता पारनेर तालुक्यात आहे, मात्र, पारनेरच्या बाहेर त्यांची फारशी लोकप्रियता नाही. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीत तो टिकणार नाही, असा टोमणा पवार यांनी लंके यांना मारला. मात्र त्यांच्या निर्णयावर आपण काय बोलणार, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मला समोरच्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या आश्चर्य वाटते. अगोदर त्यांनी कोणालाही घेणार नाही, असे सांगितले. नंतर मात्र त्यांनी आता निलेश, निलेश करायला सुरुवात केली आहे, हे चुकीचे आहे, असे टीकास्त्र पवार यांनी सोडले.