लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी डबल धमाका केला आहे. एकीकडे अजित पवार यांना धक्का देत आमदार निलेश लंके यांची घरवापसी करण्यात यश मिळवलं आहे.तर दुसरीकडे मनसे नेते वसंत मोरे यांनाही जवळ करण्यात शरद पवार गटाला यश आलं आहे. मोरे आणि लंके यांनी आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अशोक पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. आमदार निलेश लंके यांचे ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकारचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
निलेश लंके यांनी कोविड काळात प्रचंड काम केलं : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, की निलेश लंके नगर जिल्ह्यातले प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत. सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. कोव्हिड सेंटरमध्ये शिरून काम करणारा एकटा नेता असेल. पवारसाहेबांची विचारधारा मान्य करून काम करताहेत. पवार साहेबांचा फोटो लाऊन काम करताहेत, असंही जयंत पाटील म्हणाले.
मी कायम पवारसाहेबांच्या विचारासोबतच : निलेश लंके
आमदार निलेश लंके म्हणाले, की मी पवारसाहेबांच्या विचारांसोबतच आहे. मला अजून आठवत माझ्या विधानसभेचा नारळ साहेबांच्या हस्तेच फोडला होता. मी पवार साहेबांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलं होतं. त्यावेळची परिस्थिती वाईट होती, तेच पुस्तकात लिहिलंय. त्या पुस्तकाच प्रकाशन आज करतोय. साहेबांची विचारधारा कधीच सोडली नाही. विचारधारा आणि पक्ष वेगळा नाही, असे म्हणत शरद पवार यांच्यासोबत असल्याचे निलेश लंके यांनी स्पष्ट केलं. लोकसभा उमेदवारीबद्दल बोलताना लंके म्हणाले, माझी आणि साहेबांची निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. आजचा कार्यक्रम पुस्तक प्रकाशानाचा आहे. अजित पवार काय बोलले ते ऐकल नाही. कान आणि तोंडात चार बोटाच अंतर असतं. प्रत्यक्ष बोलण्यानंतर प्रतिक्रिया देईन, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर दिली आहे. साहेब सांगतील तो आदेश मान्य, असं म्हणत निलेश लंके यांनी थेट बोलणे टाळले आहे.
कारवाईच्या भीतीने निलेश लंकेंनी प्रवेश टाळला. कारवाई झाल्यास सहा वर्ष निवडणूक लढवतां येणार नसल्याने प्रवेश टाळल्याची चर्चा आहे.