बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षांत एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या रुपाने जवळपास एकांगी निवडणूक पाहायला मिळाली. यंदा दोन राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीतून ही दुरंगी निवडणूक आकार घेऊ लागली.
पण आता ही तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरुद्ध दंड थोपटले आहेत. बारामतीमधून आपण निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार, असा निर्धार विजय शिवतारे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
‘नमो विचारमंच’ नावाखाली निवडणूक लढणार
बारामतीमधील मतांचं गणित सांगताना विजय शिवतारे यांनी आपण ही निवडणूक ‘नमो विचारमंच’ या नावाखाली लढवणार असल्याचं सांगितलं. “प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही लढाई मी लढतोय. मी महायुतीच्या विरोधात नाही. मी एकनाथ शिंदेंचा शिलेदार आहे. देवेंद्र फडणवीसांना गुरू मानणारा माणूस आहे. नरेंद्र मोदींशी निष्ठा असणारा मी माणूस आहे. मी बंडखोरी केलेली नाही. इथे पवार विरुद्ध पवार हाच सामना चालू आहे. विरोधातल्या ५ लाख ८० हजार मतदारांनी जायचं कुठे?” असा प्रश्न विजय शिवतारे यांनी उपस्थित केला.
“अजित पवारांनी नीच पातळी गाठली”
“२०१९च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरुद्ध केलेला प्रचार राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी तेव्हा आजारी होतो. त्यामुळे अॅम्ब्युलन्समध्ये माझा पूर्ण प्रचार झाला. पण अजित पवारांनी तेव्हा म्हटलं की मरायला लागला आहात तर कशाला निवडणूक लढवताय? माझी गाडी कुणाची आहे, कुठल्या कंपनीची आहे वगैरे चौकशी करेपर्यंत अजित पवार खालच्या स्तरावर उतरले. तू कसा निवडून येतो तेच मी बघतो, महाराष्ट्रभरात मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, पाडतो म्हणजे पाडतो असं ते म्हणाले”, अशा शब्दातं विजय शिवतारे यांनी टीका केली.
“गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला. पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती. पण मी त्यांना माफ केलं आहे. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो. पण तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांच्या उर्मटपणावर बारामती मतदारसंघात लोक म्हणाले की अजित पवार उर्मट आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मत देणार नाही, सुप्रिया सुळेंना मत देणार. दौंडमध्ये लोक असं म्हणत होते”, असं विजय शिवतारे म्हणाले.
“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय”
“एखाद्याचं चूक केली तर त्याला पश्चात्ताप तरी असतो. पण यांना तो पश्चात्तापही नाही. जणूकाही लोकांना फसवणे हा जन्मजात अधिकार असल्यासारखे हे वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे”, अशी टीका विजय शिवतारे यांनी यावेळी केली.