महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १८ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला.मला माझी पोरं कडेवर घ्यायचीत. दुसऱ्याची पोरं कडेवर घ्यायची नाहीत, असं म्हणत त्यांनी राजकीय पक्षांना टोला लगावला.
राजकारणासाठी सोशल मीडियाचा कसा वापर केला गेला पाहिजे हे कळायला हवे. एक खूप शक्तीशाली माध्यम तुमच्याकडे आहे. सोशल मीडियाचा वापर कार्यकर्त्यांनी केल्यास त्याचा खूप फायदा होऊ शकतो. माझेही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जातात. मी गाडीतून खाली उतरलो की मागे गाणं ‘आराररारा..आरारं..रारा’ वाजतं. याचा अर्थ काय असतो. असं काही लोक काहीही पाहत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
सोशल मीडियाचा वापर कसा करायचा यासाठी व्याख्याने घेण्याचं ठरवलं आहे. राजकारणात काही लागत असेल तर तो म्हणजे संयम. आज जे राजकीय पक्ष दिसत आहेत ते पक्ष कधीपासून आहेत. सगळ्यांना वाटतं सगळं श्रेय पंतप्रधान मोदींचं आहे. पण, ते पूर्णपणे खरं नाही. यासाठी अनेक लोकांनी श्रम घेतले आहेत. १९५२ मध्ये जनसंघाची स्थापना झाली अन् १९८० मध्ये त्याचा भारतीय जनता पक्ष झाला, असं ठाकरेंनी सांगितलं
भाजपमधील अनेक नेत्यांनी मेहनत केली तेव्हा कुठे सत्ता आली. गेल्या अठरा वर्षांमध्ये मी माझे भाग्य समजतो. की, अनेक चढउतार आले, पण तुम्ही कायम माझ्यासोबत राहिलात. यश कुठं जातंय. यश मिळणार म्हणजे मिळणार. मी तुम्हाला ते देणार पण, थोडा संयम ठेवा, असं आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं.
लोकसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीबाबत राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मनसे नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत गुप्त बैठका पार पडल्या होत्या. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल का? असे प्रश्न सर्वांना पडला होता.