पुणे |
पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त यांच्यासाठी लाच मागणाऱ्या खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्यासाठी लाच मागणाऱ्या इसमास जहांगीर हॉस्पिटलच्या पार्किंग येथून १ लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना ताब्यात घेण्यात आले.
ओंकार जाधव असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
यातील तक्रारदार यांचेविरुद्ध सहायक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे कात्रज-कोंढवा बायपास रोड, पुणे येथील जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज होता. सदर तक्रारी अर्जाची चौकशी सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील देहुरोड यांचे कडे सुरु होती. सदर तक्रारी अर्जामध्ये तक्रारदार यांचे विरुद्ध भा.दं.वि. कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी ५,००,००० रुपये लाचेची मागणी लोकसेवक मुगुटलाल पाटील ह्यांचे सुचनेवरून खाजगी इसम जाधव यांनी केलेबाबतची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक स.पो.आ. मुगूटलाल पाटील यांच्याकरीता खाजगी इसम ओंकार जाधव याने रु. 5,00,000/- ची लाच मागणी करुन, दि. 17/02/2024 रोजी लाचेचा पहिला हफ्ता म्हणुन रु. 1,00,000/- रुपये पंचासमक्ष लाचेची रक्कम स्विकारली असता, खाजगी इसम ओंकार जाधव यास ताब्यात घेण्यात आले असून, कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.