राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) केली जाणारी कामे करता येणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्याच्या गृहनिर्माण खात्याने घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना आता ‘म्हाडा’ची १५ लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपर्यंतची कामे सोडत (लॉटरी) पद्धतीने थेट मिळू शकणार आहेत. या निर्णयाचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी स्वागत केले आहे.
आतापर्यंत जिल्हा परिषदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (पी. डब्ल्यू. डी.) सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दहा लाख रुपयांच्या खर्चाच्या मर्यादेपर्यंतची कामे सोडत पद्धतीने दिली जात असत. मात्र याला ‘म्हाडा’च्या कामांचा अपवाद होता. यामुळे ‘म्हाडा’ची कामे मिळावीत, या मागणीसाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना गेल्या अनेक वर्षांची प्रयत्न करत होती. सरकारच्या या निर्णयाने बेरोजगार अभियंत्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. शिवाय यामुळे संघटनेच्या मागणीला यश आल्याची प्रतिक्रिया रवींद्र भोसले यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची संख्या मोठी आहे. या सगळ्याच अभियंत्यांनी त्यांची नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना राज्य सरकारच्या सर्वच विभागांतील कामे ही सोडत पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. दरम्यान, या निर्णयामुळे ‘म्हाडा’च्या एकूण कामांपैकी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के, सहकारी संस्थांना ३३ टक्के कामे मिळू शकणार आहेत. उर्वरित ३४ टक्के कामे अन्य कंत्राटदारांना खुल्या निविदेद्वारे दिली जाणार आहेत.
उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली काम वाटप समिती
दरम्यान, ‘म्हाडा’तील एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना सोडत पद्धतीने वाटप करता यावीत, यासाठी ‘म्हाडा’तील उपमुख्य अभियंत्याच्या अध्यक्षतेखाली काम वाटप समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फतच सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतची कामे वाटप केली जाणार आहेत. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे संघटनेच्या वतीने सरकारचे आभार मानण्यात आले आहेत.