20.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना; असरच्या अहवालातून यंदाही शैक्षणिक अधोगतीचे दर्शन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या असर या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशावताराचे दर्शन घडले आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण ६८ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला नाही तर इयत्ता दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास २१ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आला नाही, तर सोपी इंग्रजीतील वाक्ये जवळपास ३९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाहीत.

शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसते आहे.

 

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने देशभर केलेल्या ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष बुधवारी जाहीर केले. यंदा राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. असरचा यंदाचा पंधरावा अहवाल आहे. गेल्या पंधरा अहवालांप्रमाणेच राज्याच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले यंदाच्या अहवालानेही दिले आहेत. यंदा १४ ते १८ वर्षे या वयोगटातील म्हणजे साधारण आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक, गणिती कौशल्ये, त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजन अशा बाबींचे १२०० घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.

 

सर्वेक्षणातून काय दिसले?

 

या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार १४ ते १६ म्हणजे आठवी ते दहावीच्या ७६.४ टक्के तर १७ ते १८ म्हणजे अकरावी, बारावीतील ७९ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांना वाचता येणे अपेक्षित असलेला मराठी परिच्छेद वाचता आला. विद्यार्थ्यांना वाचनास दिलेला उतारा पुढील प्रमाणे होता. दिनूच्या गावातून एक सुंदर नदी वाहते. गावातील लोक तिथे रोज गुरे चरायला घेऊन जातात. एके दिवशी शहरातील काही लोक नदीकाठी फिरायला आले.

 

तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भाग देण्याचे गणित जमलेले आठवी ते दहावीतील अवघे ३५.७ टक्के तर अकरावी, बारावीचे ३२.१ टक्के विद्यार्थी आढळले. ८८३ भागिले ७, ५३७ भागिले ४ अशा स्वरूपाची उदाहरणे विद्यार्थ्यांना सोडवण्यास देण्यात आली होती.

 

इंग्रजीतील सोपी वाक्ये, प्रश्न वाचू शकणाऱ्या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ५०.६ टक्के तर अकरावी, बारावीतील विदयार्थ्यांचे प्रमाण ६०.८ टक्के आहे.

 

वाचता येते पण अर्थ कळेना

 

मराठी परिच्छेद वाचू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण इंग्रजी आणि गणिती कौशल्यांच्या तुलनेत चांगले असले तरी वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून उपयोजन करता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण फारसे नाही. वाचता येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी आठवी ते दहावीच्या जवळपास ४० टक्के तर अकरावी, बारावीच्या ३० टक्के विद्यार्थ्यांना ओआरएसचा वापर कसा करावा याबाबत दिलेल्या सूचना वाचून त्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. पट्टीवर ठेवलेल्या किल्लीची लांबी किती, वजन, हिशोब, वेळेचे गणित करता न येणाऱ्या आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाणही पन्नास टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसते आहे.

 

 

फोनचा सर्रास वापर पण सुरक्षेबाबत अनभिज्ञता

 

या सर्वेक्षणानुसार १४ ते १६ वयोगटातील १५.१ तर १७ ते १८ वयोगटातील ४२.६ टक्के विद्यार्थ्यांकडे स्वतछचा स्मार्टफोन आहे. स्वतचा फोन नसला तरी स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अनुक्रमे ९०.४ आणि ९५.६ टक्के असल्याचे दिसते. त्यातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी समाज माध्यमांचा वापर करतात. मात्र खात्यातील माहिती गोपनिय ठेवणे, एखाद्या खात्याबद्दल तक्रार करणे किंवा ब्लॉक करणे, पासवर्ड बदलणे याबाबत जागरूक असलेल्या आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण २६ ते ३८ टक्के तर अकरावी, बारावीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० ते ५८ टक्के असल्याचे दिसते आहे. शिक्षणापेक्षा मनोरंजनासाठी फोनचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसते. दिवसभरात शैक्षणिक उद्देशाने किमान एखाद्या कृतीसाठी स्मार्ट फोन वापरणारे आठवी ते दहावीतील ७२ टक्के विद्यार्थी आहेत तर मनोरंजनासाठी फोन वापरण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक उद्देशाने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांचे प्रमाण ६९.७ टक्के तर मनोरंजनासाठी फोन वारणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के असल्याचे दिसते.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles