कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव गोठा ते खिरखंडी रस्त्यावर सोमवारी दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी शनिवारी दि. ९ डिसेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील डोमरी या गावचे रहिवासी महादेव लक्ष्मण जगताप (वय ५५) व बाळू लक्ष्मण जगताप (वय ४६) हे ऊस तोडणी मुकादम असून गेली ते जरंडेश्वर शुगर मिल्ससाठी ऊस तोडणीचे काम करत होते. चिमणगाव येथे महादेव जगताप यांच्या ऊस तोडणी टोळ्या काम करत आहेत तर बाळू जगताप यांची एक टोळी आहे. दोघे सख्खे भाऊ मिळून ऊस तोडणीचे कामकाज पाहतात. सोमवार दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एकंबे येथे ऊस तोडणी कामगारांना जेवणाचा डबा पोहोच करून महादेव व बाळू जगताप हे हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीवरुन (एमएच २३ एस. १९९७) खिरखंडीवरून चिमणगावकडे निघाले होते. चिमणगाव गोठा येथे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करायचा आणि चिमणगावात असलेल्या टोळीबरोबर ऊस तोडण्यासाठी जायचे, असे या दोघांचे एकंबे येथून निघताना ठरले होते.
खिरखंडीवरून चिमणगाव गोठा येथे जात असताना जरंडेश्वर शुगर मिलच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर नवीन इमारतीचे काम सुरू असून त्याच्यासमोर रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले.अपघात झाल्यानंतर आसपास कोणी नसल्याचा फायदा उठवत ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर चालकाने पोबारा केला. त्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांना अपघात होऊन दोघेजण जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसले.त्यांनी जखमी व्यक्तींच्या मोबाइलवरून शेवटचा कॉल झालेल्या व्यक्तीबरोबर संपर्क साधला आणि अपघात झाल्याची माहिती दिली. टोळीतील कामगार अपघातस्थळी दाखल झाले.त्यांनी रुग्णवाहिका बोलावून दोघांना तातडीने सातारच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर थोड्याच वेळात महादेव जगताप यांचा मृत्यू झाला तर बाळू यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी दि. ६ डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
पाटोदा तालुक्यातील जगताप कुटुंबीय व नातेवाइकांनी शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांची भेट घेऊन त्यांना अपघाताबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी जाऊन पंचनामा केला.
सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघात करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.