बीड शहरातील तरुणास लग्न लावण्याच्या बहाण्याने तीन लाख रुपयाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या मुलाचे लग्न एका मुलाची आई असलेल्या महिलेसोबत लावून दिले.
कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू तरुणाशी बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
या फसलेल्या तरुणाचा विवाह होण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने व कुटुंबीयांनी लग्न जमवण्याचे काम करणाऱ्या राजाभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तरुणासह त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन कर्नाटकातील बिदर येथे नेले. तिथे सुनीता नावाच्या महिलेची भेट घालून दिली व तिथेच दिव्या विजयकुमार खानापुरे ही मुलगी त्यांना दाखवली. साडेतीन लाख रुपये मुलीच्या कुटुंबीयांना दिले तरच विवाह होईल, असे राजाभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर 3 लाख 30 हजार रुपयांत हा व्यवहार ठरला. यापैकी 2 लाख 80 हजार रुपये कुलकर्णी यांच्याकडे दिले होते, तर 50 हजार रुपये हे लग्नाच्या एक महिन्यानंतर देण्याचे ठरले. 17 सप्टेंबर रोजी बीडमध्ये विवाह झाला.
मुलाच्या कुटुंबीयांनी महिलेकडे चौकशी केली. महिलेने सांगितले, यापूर्वी दोन लग्ने झालेली असून दुसऱ्या पतीपासून मुलगीही आहे. सुनीता या महिलेच्या सांगण्यावरून हा विवाह केला असून महिनाभरात पळून येण्यास सांगितले होते. दरम्यान, पोलिसांत दिव्या विजयकुमार खानापुरे, सुनीता (दोघी रा. बिदर, कर्नाटक), राजाभाऊ कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाळू पोरांना फसवणारी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.