राज्यभरातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली.
ते म्हणाले की, निवडणुका जाहीर केलेल्या संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबररोजी तर नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबररोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ५ नोव्हेंबररोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल.
गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबररोजी मतमोजणी होईल.