पतीने पत्नीला तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस असे म्हणणे याला सरसकटपणे क्रूरता ठरू शकत नाही. हे शब्द कशा प्रकारे उच्चारले गेले आहे, यावर ते अपमानास्पद वागणूक आहे की नाही हे ठरते.हे शब्द अपमानजनक पद्धतीने उच्चारले की नाही याचा संदर्भ मिळेपर्यंत त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने एका घटस्फोट प्रकरणात दिला आहे.
न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने एका घटस्फोटाच्या खटल्यात पतीच्या बाजूने घटस्फोट मंजूर करण्याचा निर्णय दिला. या खटल्याचा निकाल देताना खंडपीठाने म्हटले की पक्षकार हे मराठी आहेत. तसेच मराठी भाषेत हे शब्द कोणत्याही स्तरावर सर्रासपणे उच्चारले जातात. तसेच उच्चाराप्रमाणे त्याचे संदर्भ बदलतात. त्यामुळे जोपर्यंत हे शब्द अपमान करण्याच्या हेतूने हे शब्द उच्चारले आहेत हे जोपर्यंत दाखवता येत नाही तो पर्यंत सरसकटपणे त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच न्यायालयाने पुढे असेही म्हटले आहे की, पतीने असे शब्द वापरून शिवीगाळ केल्याच्या आधारावर पत्नीने पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र हे अपमान करण्याच्या हेतून उच्चारल्याच्या पुष्टीकरणासाठी कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे पतीसाठी हे क्रूर ठरू शकते, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणात पतीने ज्या घटनांदरम्यान पत्नीला उद्देशून तू वेडी आहेस तुला अक्कल नाही असे म्हटले त्या घटनांचा आधारभूत तपशील दिलेला नाही. त्यामुळे हे शब्द केवळ तोंडून काढल्याचा अर्थ असा होऊ शकत नाही की तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
नेमके काय होते प्रकरण
या प्रकरणात पत्नी पतीविरोधात दावा दाखल केला होता. पतीने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. पती तिला तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस म्हणून शिवीगाळ केली. तसेच तो रात्री उशिरा घरी यायचा आणि बाहेर फिरायला चला असे म्हटल्यास तिच्यावर ओरडायचा, असा दावा तिने केला.
तर त्या विरोधात पत्नीने बिनबुडाचे आरोप करून फौजदारी खटला दाखल केला. त्यामुळे समाजात त्याच्या कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होऊन बदनामी झाली. ही एक प्रकारची क्रूरता आहे, असा आरोप पतीने केला होता.
कौटुंबिक न्यायालयासमोर घटस्फोट प्रकरणातील पुरावे तपासण्याच्या टप्प्यानंतर पत्नीने प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले. या एफआयआरचा तपशील पाहिल्यास लक्षात येते की पत्नीने कोणतेही पुरावे आणि संदर्भ दिलेले नाही, ज्यामधून पतीचा तिचा अपमान करण्याचा हेतू होता हे सिद्ध होईल. त्यामुळे पत्नीने पतीला केलेल्या खोट्या निराधार आरोपामुळे पतीला गंभीर वेदनादायक परिस्थितीला सामोरे जावे लागले. ही पतीसाठी क्रूरताच ठरेल. त्यामुळे पती विवाह तोडण्यास पात्र आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीकडून दाखल केलेले घटस्फोटाचे अपिल मान्य केले.


                                    