जालना |
अखेर मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवसांनंतर उपोषण सोडले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 17 वा दिवस आहे. या उपोषणस्थळी येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संभाजीराजे, उदयनराजे यांनी यावं आणि आपल्याला आरक्षणासंदर्भात आश्वासन द्यावं, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. मुख्यमत्री एकनाथ शिंदे हे उपोषणस्थळी दाखल होत, मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण मागे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनंतर त्यांनी उपोषणस्थील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत, त्यांच्याशी चर्चा करत केली. यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी अखेर उपोषण सोडलं. गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण त्यांनी मागे घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं.
धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये
दरम्यान, आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं मनोज जरांगे-पाटील म्हणाले. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये आहे. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणखी 10 दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे आणि आणखीन वेळ वाढवून देईल पण आरक्षण घेणार, असंही जरांगे पाटील म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी आरक्षणात स्वत:हून लक्ष घातलं आहे. धाडसी निर्णय घेण्याची क्षमता एकनाथ शिंदेंमध्ये आहे. आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
- काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
- मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच न्याय देऊ शकतात. राज्यातील मराठा समाजाला एकनाथ शिंदे यांची आशा आहे.
- मी भारावून न जाता ,आरक्षण प्रश्नासाठी शिंदे साहेबांच्या मागेच लागणार आहे. इथून पुढच्या काळात आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
- माझ्या पोरांचा घास काढू नका, सरकारला आणखी 10 दिवस वाढवून देतो.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासह इतर निर्णय धाडसाने घेतले आहेत.
- शिंदेसाहेब न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी आज समोर येऊन सिद्ध केलं.
- आपण जनआक्रोश आंदोलन असं नाव या आंदोलनाला दिले. आरक्षण तुमच्या आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
- जीव गेला तरी तुमच्या पोरांच्या पदरात आरक्षण टाकेल. शिंदे साहेब येणार म्हटले, आणि मी ही त्यांना आणून दाखवले. मी आरक्षणाबाबत मागे हटणार नाही शिंदे साहेबांना हटू देणार नाही.


