- ‘त्या’ 12 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सुरू केलेल्या मोहिमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ
मुंबई |
प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर येण्याच्या दृष्टीने चालू असलेल्या कार्यवाहीचा आढावा आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला. हा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती यावेळी धनंजय मुंडे यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महा आयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कृषी मंत्री श्री मुंडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशन 2023-24 मधील पूरक मागण्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 4000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे त्यामुळे त्याला तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळणे गरजेचे आहे.
निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. पी.एम.किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून सुरू आहे. पी एफ एम एस प्रणाली मध्ये तांत्रिक कार्यवाही करण्यासाठी आवश्यक कालावधी कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभापासून विविध अडचणीमुळे वंचित राहिलेल्या 12 लाख शेतकऱ्यांचा पीएम किसान व नमो महा महासन्मान योजनेत समावेश करण्यात यावा यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर कृषी, महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत एकत्रित विशेष मोहीम सुरू केली होती, त्यांतर्गत आतापर्यंत 4 लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे. भूमिअभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले असून, यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहीमेस आणखी 7 दिवस मुदतवाढ देण्याचेही निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.