बीड |

शेतकऱ्यांना आधार व मदत करण्याची भूमिका सरकारची आहे हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. ऊसतोड मजूर कामगार मंडळ स्थापन केले. मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. एक लाख कोटी लागले तरी चालेल, पण मला इथल्या लोकांना गोदावरी खोऱ्यातून पाणी द्यायचे आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील जाहिरे सभेत दिले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची आज बीडमध्ये  जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बीडकरांच्या प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी सभेत बोलताना दिले.शरद पवार यांच्या १७ तारखेला झालेल्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी सरकारी योजनांबद्दलही त्यांनी जनतेला माहिती दिली

अजित पवार म्हणाले,  बीड कष्टकऱ्यांची भूमी आहे. सरकारच्या माध्यमातून जनतेचे भले करायचे आहे. चढउतार राजकीय जीवनात येत असतात. आम्ही महापुरुषांचा आदर करणारे आहोत. महायुती सरकारमध्ये असलो तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व धर्मामध्ये जातीय सलोखा राखला गेला पाहिजे ही भूमिका आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. पीक विम्यासाठी बीड पॅटर्न काढला. तुमचे पैसे राज्य व केंद्र सरकार भरत आहे. एक रुपयाचा उतरवला आणि सरकारवर साडे चार हजार कोटी रुपये कर्ज झाले. मात्र, शेतकऱ्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. ही भूमिका सरकारने घेतली.

शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी किंवा समस्या तात्काळ सोडवल्या जातात, मात्र, विरोधक नेहमी चुकीचे सांगतात. सत्ता ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. दोन लाख क्विंटल कांदा खरेदीचा निर्णय शेतक-यांसाठी घेतला. एवढ्या राज्यात वेगवेगळे प्रसंग येतात त्यातून मार्ग काढावा लागतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो आहे. शेतकरी ही माझी जात आहे. मराठवाडयातील पाण्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जनतेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न, सहकार प्रश्न सोडवायचा असेल, लोकांनी दिलेला पैसा हा कष्टाचा व कराचा आहे तो चांगल्या कामासाठी खर्च झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात आहे. त्यांचा करिष्मा आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही निर्णय घेतला. आता आपल्याला मागे वळायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशा एकत्र लढवायच्या आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे तर राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे, हेही पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात जातीय सलोखा राहायला हवा

प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात. मात्र त्यातून पुढे जात राहायचं असतं. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मांमध्ये आपण एकत्र असल्याची भावना असली पाहिजे. येथेच राहून जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. बीडमधील पीक विम्याचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. आता १ रूपयांत विमा काढता येणार आहे. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार पैसे भरणार आहे. केंद्राच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.

आम्ही येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. ही पदे केवळ मिरवण्यासाठी नाही. बीडकरांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या येत्या काळातील अधिवेशनात सहा लाखांचे बजेट सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात बीडकरांचे प्रश्न मार्गी लावणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जो निर्णय घेतला. काही लोक म्हणतात फूट नाही तर आम्ही ही म्हणतोय फूट नाही. अजित पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. आयुष्यात कधीतरी निर्णय घ्यावा लागतो. तो सामुहिक निर्णय आम्ही घेतला, असेही प्रफुल पटेल म्हणाले.

बीडची ही अभूतपूर्व सभा झाली आहे. या सभेने राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे लोक आहेत हे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढील निवडणूका घड्याळ चिन्हावर आपण लढणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी जाहीर केले.