बीड |
खोऱ्याचा दांडा डोक्यात घालुन एकाने आपल्या बायकोचा खून केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर “साहेब, मी माझ्या पत्नीचा खून केला”, अशी कबुली देतआरोपी पती पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.मंगल भोसले, असे मृत महिलेचे नाव आहे. तर गुंडीराम भोसले असे आरोपी पतीचे नाव आहे.
गोठ्यामध्ये काम करत असताना पती गुंडीराम भोसले याने खोऱ्याच्या दांड्याने मंगल भोसले यांचा खून केला. तसेच खून केल्यानंतर गुंडीराम भोसले हा नेकनूर पोलीस ठाण्यात स्वत: हजर झाला आणि साहेब मी माझ्या बायकोला मारून आलोय, मला अटक करा, अशी कबुली त्याने दिली.घटनेची माहिती मिळताच, यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी पोलिसांना मंगल भोसले यांचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी सातच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. मंगल भोसले यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दरम्यान, त्यांच्या पतीने त्यांचा खून का केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस या घटनेचा तपास करत आहे.


                                    