पुणे |
गेल्या काही दिवसात एमपीएससी पास झालेल्या दर्शना पवारचं खून प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे याला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. यावेळी या खून प्रकरणात राहुलचाच हात असल्याच समोर आलं आहे. आज सकाळी मुंबईमधून पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतलं आहे. अधिकारी पदाला गवसणी घालणाऱ्या दर्शनाचा करुण अंत झाल्याचं यातून समोर आलं आहे.
आधीपासूनची ओळख
दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख होती. दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. यादरम्यान झालेल्या परीक्षेत दर्शना पास झाली. वन खात्यात रुजू होण्यासाठी काही काळ उरला असतानाच घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. दरम्यान राहुलने तिच्या घरच्यांकडे काही वेळ मागितला. पण घरच्यांनी तिच्या लग्नासंबंधी पुढील हालचाली सुरू केल्या होत्या. याचा राग मनात ठेवून राहुलने दर्शनाची हत्या केली.
असा होता घटनाक्रम
एका सत्कार समारंभासाठी दर्शना पुण्यात आली होती. या दरम्यान राहुल आणि तिची भेट झाली. हे दोघेही राजगडावर ट्रेकिंगसाठी गेले. पण यानंतर थेट दर्शनाचा मृतदेहच सापडला होता. तिच्या डोक्यावर आणि संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या. राजगडावर जाताना दर्शना आणि राहुल एकत्र गेले होते. पण खाली येताना मात्र राहुल एकटाच आल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसल होतं. त्यामुळे पोलिसांचा राहुलवर संशय बळावला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू केला. राहुलच्या शोधासाठी पाच पथकं तयार केली. राहुलच्या घरच्यांशी होत असलेल्या संपर्कावरून पोलिसांनी राहुलचा माग काढून त्याला मुंबईमधून ताब्यात घेतलं.