पुणे |
पुणे विभाीय अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्या शासकीय निवासस्थानी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील दालनात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने शुक्रवारी दुपारी छापा टाकला. विभागीय आयुक्त कार्यालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले आहेत. 8 लाख रुपयांच्या लाच प्रकरणी सीबीआयने धाड टाकली आहे. तीन ते चार तास चौकशी केल्यानंतर अनिल रामोड यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
डॉ. रामोड यांच्याकडे पुणे विभागातील पाच जिल्ह्यातील महसुल विषयक सूनावण्या चालतात. शुक्रवारी डॉ. रामोड यांच्या दालनात अचानक सीबीआयचे पथक दाखल झाले. गेल्या तीन ते चार तासापासून चौकशी सुरू आहे. दरम्यान डॉ. रामेड यांच्या दालनाबहेर सीबीआयचे अधिकारी थांबलेले आहेत. त्याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आज साहेब भेटणार नाहीत, असे सांगत आहेत.
रामोड यांच्याविषयी मागील काही दिवसांपासून तक्रारी कानावरती येत होत्या. या तक्रारींची शाहनिशा करुन सीबीआयने रामोड यांच्याभोवती सापळा लावला होता. आज लाच स्वीकारताना अखेर सीबीआयने रामोड यांना अटक केली. रामोड हे मुळचे नांदेडचे असून मागील 2 वर्षांपासून ते पुण्यात अरितिक्त विभागीय आयुक्त आहेत.