अंबाजोगाई |
११ वर्षापूर्वी राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या परळी येथील अफू लागवड प्रकरणी दाखल गुन्ह्यातून १७ आरोपींची अंबाजोगाई सत्र न्या. संजश्री घरत यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
सदरील प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, परळी तालुक्यातील मोहा, घोरपडदरा तांडा शिवारात काही शेतकरी विनापरवाना बेकायदेशीररित्या अफुच्या झाडाची लागवड करून ती जोपासून त्याचे पिक (बोंडे) चोरुन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर माहितीच्या आधारे सिरसाळा पोलिसांनी २५ फेब्रुवारी २०१२ रोजी मोहा, घोरपडदरा तांडा शिवारातील शेतात छापा मारून अफूची झाडे जप्त केली आणि १३ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच मोहा वंजारवाडी शिवारातील छाप्यातही छापा मारून अफूची झाडे जप्त करत आरोपींवर सिरसाळा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सदरील प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सुनावणी दरम्यान एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद व बचाव गृहीत धरून न्या. संजश्री घरत यांनी १७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात १० आरोपींच्या वतीने अॅड. विक्रम खंदारे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. बालाजी बाबासाहेब किर्दंत व अॅड. महेश बालासाहेब चव्हाण यांनी सहकार्य केले. तर, ७ आरोपींच्या वतीने अॅड. अजित लोमटे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. किशोर देशमुख, अॅड. नवनाथ साखरे, अॅड. धनराज लोमटे, अॅड. ओमप्रकाश धोत्रे, अॅड. विश्वजित जोशी व अॅड. विवेकानंद गिराम यांनी सहकार्य केले.


