- Advertisement -
बीड |
मागील काही दिवसात अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील 2 हजार पेक्षा जास्त गावात नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. यामुळे तातडीने मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यातील पाहणी करून कृषी मंत्री अब्दुल सत्तार आज बीड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करा तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा पासून वंचित राहणार नाही , याची गांभीर्याने दक्षता घ्या असे निर्देश त्यांनी शासकीय यंत्रणेस दिले.
राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा होत असून मदतीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज बीड जिल्ह्यातील कोळवाडी, धनगर वाडी, पिंपरनई , लिंबागणेश येथे गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
ते म्हणाले, राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्याबरोबरच विदर्भातील जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा करण्यात येणार असून पश्चिम महाराष्ट्रातील नुकसान पाहणी साठी कृषी आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत असे सांगून कृषी मंत्री श्री सत्तार यांनी शेतकऱ्यांना धीर दिला
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीड जिल्ह्यात झालेले नुकसानीची माहिती देण्यात आली त्याची दखल घेत गारपीट, अवकाळी पाऊस व वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या फळबाग, मिरची, कांदा, भाजीपाला आदी पिकांची पाहणी केली. सोबतच पिंपरनई येथे वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी संवेदनाशील होत यावेळी त्यांना धीर दिला.
महिला शेतकऱ्यांपुढे कृषिमंत्री झाले नतमस्तक
पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे शेतातील पीक मातीमोल झाले असून गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचे पत्रे उडून नुकसान झाले आहे, असे पिंपर्वणी गावातील महिला शेतकऱ्यांनी कृषिमंत्री श्री सत्तार यांना सांगितले. शेतकरी व महिला व्यथा व वेदना मांडताना मंत्र्यांपुढे हात जोडत होत्या ते बघून स्वतः नतमस्तक होत कृषी मंत्री श्री.सत्तार यांनी या आस्मानी संकटात पुढे शेतकरी हातबल झाला असला तरी राज्य शासन मदतीपासून नुकसान झालेल्या एका देखील शेतकऱ्याला वंचित राहू देणार नाही असा विश्वास दिला.
पावसाच्या तडाख्यामुळे व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना आवश्यक ती मदत जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने करण्यात येईल असे यावेळी व्यथा मांडत असलेल्या ग्रामस्थ महिलांना त्यांनी सांगितले . जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ मुंडे यांना यावेळी अडचणीतील नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, विभागीय कृषी सहसंचालक दिनकरराव जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, तहसीलदार सुहास हजारे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, तालुका कृषी अधिकारी श्री. गंडे यासह कुंडलिक खांडे ,चंद्रकांत नवले , राजेंद्र मस्के , छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, संचालक राजेंद्र ठोंबरे , सतीष ताठे यांच्यासह महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे अधिकारी , कर्मचाऱ्यांची , पदाधिकारी , शेतकरी, ग्रामस्थ यांची मोठी उपस्थिती होतीे.