नवी दिल्ली |
भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना भारताच्या संरक्षणासाठी कठोरातील कठोर पाऊल उचलण्यात भाजप मागे पुढे पाहणार नाही असे मत व्यक्त केले.
घराणेशाही मोडीत काढण्यासाठी हनुमानासारखं कठोर व्हावं लागतं. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र घेऊनच भाजप मार्गक्रमण करत आहे. देशाच्या नावावर राजकारण करणं ही भाजपची संस्कृती नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन चालण्याची आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्नं बघायची आणि त्याहून छोटं यश मिळवून आनंद साजरा करायचा, एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. पण भाजपची राजकीय संस्कृती मोठी स्वप्नं बघणं आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करणं ही आहे, असा टोला मोदींनी यावेळी लगावला.
आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या या पक्षांकडून आपल्याविरोधात कट-कारस्थानं चालूच राहतील. आपण देशवासीयांच्या स्वप्नांना, आकांक्षांना दबले जाताना पाहू शकत नाही. त्यामुळे आपला जोर देशाच्या विकासावर आहे. देशवासीयांच्या कल्याणावर आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.