मुंबई |
महिलेच्या मधाळ संवादात हरवत व्हिडिओ कॉलसमोर नग्न होणे दादरमधील एका ऑडिटरला भलतेच महागात पडले आहे.व्हिडिओच्या आधारे त्यांना धमकावत त्यांच्याकडून तब्बल ६५ हजार रुपये उकळण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा नोंदविला आहे.
दादर परिसरात ४६ वर्षीय तक्रारदार राहण्यास असून ते ऑडिटचे काम करतात. १२ फेब्रुवारीला त्यांना पूजा नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनीही फेसबुकवरील तिचा फोटो बघून रिक्वेस्ट स्वीकारली. त्यांच्यात संवाद सुरू झाला. ओळखीतून व्हॉटस्ॲप क्रमांक शेअर केले. १८ फेब्रुवारीला व्हॉट्सॲपवर अश्लील संवाद सुरू झाला. तिने नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल केला. तक्रारदारालाही तसे होण्यास भाग पाडले. त्यानंतर, पाच मिनिटांतच फोन कट झाला. त्यानंतर, दहाव्या मिनिटाला महिलेने अश्लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग शेअर करताच त्यांना धक्का बसला. पुढे, नग्न व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करण्याची धमकी देत पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कॉल ब्लॉक करत संवाद तोडला. त्यानंतर, वेगवेगळ्या क्रमांकावरून कॉल सुरू झाले.
२ एप्रिल रोजी थेट, सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे सांगून त्यानेही गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्यापाठोपाठ संबंधित व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड झाल्याचे सांगून ते डिलीट करण्याच्या नावाखाली तोतया यू ट्यूब अधिकाऱ्याने पैसे उकळले. त्यांच्याकडून एकूण ६५ हजार रुपये उकळले. त्यानंतरही पैशांची मागणी सुरू असल्याने त्यांना धक्का बसला. त्यांनी, पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, शिवाजी पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
फसवणुकीच्या घटना
३ एप्रिल : परळ येथील दवाखाना विकण्याच्या बहाण्याने संपर्कात असलेल्या फेसबुकवरील महिला डॉक्टरच्या एका व्हिडिओ कॉलमुळे ८० वर्षीय ब्रोकर आजोबांचे खाते रिकामे झाले. धमकावत त्यांच्याकडून तब्बल ८ लाख रुपये उकळण्यात आले.
१५ मार्च : घाटकोपर परिसरातील ७६ वर्षीय आजोबांचा मुलगा अमेरिकेत राहतो. मुलाकडे असताना त्यांना अनोळखी क्रमांकावरून सोनिया शर्मा नावाच्या महिलेने नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केला. आजोबांनाही नग्न होण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून ५ लाख ४५ हजार रुपये लुबाडले.