नवी दिल्ली |
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) आपल्या कामातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. जेव्हा एखाद्या प्रकरणाचा तपास लागत नाही तेव्हा ते प्रकरण इतर तपास यंत्रणांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली जाते. न्यायाचा ब्रॅण्ड म्हणून सीबीआयचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही थांबण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करीत आहात, ते खूप ताकदीचे लोक असल्याचे मला ठाऊक आहे. ते लोक वर्षानुवर्षे सरकार व व्यवस्थेचे घटक होते. आजही ते विविध राज्यांच्या सत्तेत सहभागी आहेत, पण तुम्हाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. एकाही भ्रष्टाचार्याला सोडू नका, अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयच्या कामाचे कौतुक केले.
सीबीआयच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सीबीआयने सहा दशकांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी पुणे, नागपूर आणि शिलाँग येथील सीबीआयच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटनही केेले.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकारने मिशन मोडवर काळा पैसा आणि बेनामी संपत्तीविरोधात कारवाई सुरू केली आहे. आज देशातील भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या राजकीय इच्छाशक्तीचा कोणताही अभाव नाही. त्यामुळे सीबीआयने कोणताही विचार करण्याची गरज नाही. एकही भ्रष्टाचारी वाचता कामा नये ही देशवासीयांची इच्छा आहे. देश, कायदा आणि संविधान तुमच्यासोबत आहे.
भ्रष्टाचारामुळे घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ
भ्रष्टाचार हा सामान्य गुन्हा नाही. भ्रष्टाचार गरिबांचे हक्क हिरावून घेतानाच अनेक गुन्ह्यांनादेखील जन्म देतो. भ्रष्टाचार हा लोकशाही आणि न्यायाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर आहे. जिथे भ्रष्टाचार असतो तिथे विशेष इको सिस्टीम काम करीत असते. त्या ठिकाणी तरुणांना योग्य संधी मिळत नाही. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू असतो. येथूनच घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ मिळते. अशा परिस्थितीत देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही सीबीआयची मुख्य जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.