नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईवरुन विरोधकांवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांवर कारवाई करणाऱ्या तपास यंत्रणा आणि कोर्टाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असं सांगतानाच काही लोक यामुळं नाराज होत असतील पण ही कारवाई थांबणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
दिल्लीतील भाजपच्या कार्यालयाचा विस्तार तसेच रहिवासी संकुलाचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, जेव्हा भाजप सत्तेत येतो तेव्हा भ्रष्टाचार पळून जातो. PMLA कायद्यांतर्गत काँग्रेस सरकारच्या काळात (२००४-२०१४) ५००० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. पण या कायद्यांतर्गत भाजपनं गेल्या ९ वर्षात १ लाख १० हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. जे लोक भ्रष्टाचारात गुंतले आहेत त्यांच्यावर तपास यंत्रणा कारवाई करतात तेव्हा त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. जर कोर्टानं काही निर्णय दिला तर त्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही पक्षांनी मिळून ‘भ्रष्टाचारी बचाओ अभियानं’ सुरु केलं आहे, असा शब्दांत त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.
गेल्या सत्तर वर्षांत पहिल्यांदाच भ्रष्टाराऱ्यांविरोधात अशा प्रकारची कारवाई केली जात आहे. आम्ही इतकं केलं तर काही लोक वैतागतील आणि नाराज होतील. पण त्यांच्या खोट्या आरोपांमुळं भ्रष्टाचारांविरोधातील कारवाई थांबणार नाही, असंही मोदी म्हणाले.