19 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

पाटोदा नगर पंचायत; ब्रीज कम बंधारा बोगस मान्यता प्रकरणात नगर पंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकाची पहिली अटक

- Advertisement -

पाटोदा नगर पंचायत भ्रष्टाचार प्रकरणात कर्मचार्‍याचा पहिला ‘बळी’!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा । प्रतिनिधी

पाटोदा नगर पंचायत मधील ब्रिज कम बंधारासाठी बोगस तांत्रिक मान्यता प्रकरणी मंगळवारी पोलीसांनी पाटोदा नगर पंचायतचे तत्कालीन कार्यालयीन आधिक्षक सय्यद वाजेद अली यांना अटक करुन कोर्टात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणात पहिला बळी कार्यालयीन अधीक्षकांचा गेला असून, अजून किती जणांवर कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकाचे लक्ष वेधले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा जि.बीड ) नगर पंचायत हद्दीतील मांजरा नदीवरील पुल कम बंधारा बांधणे या कामात 2 कोटी 9 3 लक्ष 53 हजार 718 रूपये इतक्या रकमेची तांत्रिक मान्यता बनावट शिक्का व स्वाक्षरी करून जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे सदरील खोटे कागदपत्र दाखल करून प्रशासकीय मान्यता मिळवली व ब्रीज कम बंधारा काम अर्धवट अवस्थेत सोडून 2 कोटी 7 9 लक्ष 71 हजार 554 रूपये संबंधितानी उचलले आहे , तसेच अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद यांनी वरील बोगस तांत्रिक मान्यतेची तपासणी करून सदरील तांत्रिक मान्यता त्यांच्या कार्यालयाकडील तांत्रिक शाखा उस्मानाबाद, बीड, लातूर व इमारतीकडे छाननी केली असता विषयांकित कामास त्यांच्या कार्यालयाकडून तांत्रिक मंजुरी प्रदान केले नसल्याचे आढळून आले व त्यासंबंधी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड, तसेच मुख्य अधिकारी नगर परिषद बीड यांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. तरीही बांधकाम विभाग बीड यांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावी या मागणीसाठी औरंगाबाद खंडपीठांमध्ये फौजदारी जनहितार्थ याचिका क्रमांक 3/2022 अबलूक घुगे व शेख मोबिन हमीद यांनी अँड . नरसिंह जाधव यांच्यामार्फत दाखल केली होती. सदरील प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने या प्रकरणी नगर पंचायत लीपिकाच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पुढे तपासात काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिकाकर्ते अबलुक घुगे यांनी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने थेट विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, अधीक्षक अभियंता यांना हायकोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी पोलीस तपासावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते. आणि 6 एप्रिल 2023 पर्यंत तपास अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच पाटोदा पोलिसाकडील तपास काढून घेऊन आष्टीचे पोलिस उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर यांना तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

हायकोर्टाच्या दट्ट्याने पोलिस तपासाला गती आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिवकर यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करुन काही कर्मचार्‍यांचे जबाब नोंदविल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पाटोदा नगरपंचायतच्या तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक सय्यद वाजेद अली याला अटक करून कोर्टात हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान मंगळवारी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांनी पाटोद्यात नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांचीही चौकशी केल्याचे समजते.

पोलीस तपासाला गती येऊ लागल्याने नगर पंचायतीच्या तत्कालीन पदाधिकार्‍यांसह अधिकारी, कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. अनेक पदाधिकारी दिवसभर पोलीस ठाण्याच्या आसपास फिरत असल्याचे दिसून येत होते. तर या संबंधित असलेल्यांनी पाटोद्यातून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.

नगर पंचायतीची बैठक रद्द
पाटोदा नगर पंचायतीची बैठक दि.28 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली होती. मात्र नगर पंचायतीच्या तत्कालीन अधिक्षकांच्या अटकेची माहिती होताच पदाधिकार्‍यांनी होणारी बैठक पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात आले.

पहिला बळी कार्यालयीन अधिक्षकाचा
उच्च न्यायालयाने पाटोदा पोलीसांच्या तपासावर ताशेरे ओढल्याने थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालून आष्टीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांच्याकडे तपास दिल्यानंतर पोलीस तपासाला गती आली, पोलिसांनी कारवाई सुरुवात केली असून, पहिला बळी नगर पंचायत कार्यालयीन अधीक्षकांचा गेला असून, या प्रकरणी आता आणखी कुणा कुणाची चौकशी होऊन कुणाला अटक होईल याकडे तालुक्यातील नागरिकाचे लक्ष वेधले आहे.

विधान सभेतही झाली होती चर्चा
पाटोदा नगर पंचायत अंतर्गत ब्रीज कम बंधारा प्रकरणात बोगस मान्यता प्रकरणात कारवाई करण्यासाठी महविकास आघडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे यांनी तारांकित प्रश्‍न मांडला होता. यावेळी तत्कालीन नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्तांतर झाले आणि प्रकरण गुंडाळून ठेवले होते.

 

 

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles