मुंबई |
राज्यात सत्तांतर झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर नाही, असे वारंवार दिसून येत आहे. मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हाताला धरून खुर्चीवर बसवल्याचे समोर आले होते. विधिमंडळाच्या अधिवेशनात फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरचा माईक खेचल्याचे समोर आले होते. एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चिठ्ठी दिल्याचे दिसले. यावरून विरोधकांनी टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर देताना, आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, परंतु काही लोकांना बघवत नाही, असे म्हटले होते.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समर्थनार्थ तातडीची पत्रकार परिषदेत घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठवली. राहुल गांधी यांचा तीव्र शब्दातील निषेध करताना राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करणार असल्याची घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला. ठाकरे यांची भूमिका दुट्टपी असल्याचा आरोप ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं…
वाचायची पण परमिशन घ्यावी लागते मामुंना, आणि चालले राहुल गांधीना शिकवायला 😂 pic.twitter.com/mGYLDbJi42
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 27, 2023
सीएम, सुपर सीएमची चर्चा रंगली
संपूर्ण परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांची देहबोली काहीतरी घडणार असल्याचे सुरुवातीपासून सूचित करत होती. फडणवीस प्रचंड चिंताग्रस्त असल्याचे दिसले. अनेकदा त्यांनी स्वतःच्या डोक्याला, गालाला, कपाळाला हात लावला. त्यांच्या देहबोलीची चलबिचल सतत कॅमेऱ्यात कैद होत होती. अखेर, त्यांनी एक कागद टेबलाखाली मुख्यमंत्री शिंदे यांच्या हातात दिला. शिंदे यांनी तोच कागद, वाचू का असे आदराने उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले. फडणवीस यांनी देखील वाचण्याची गरज नाही, असे म्हटले. मुख्यमंत्र्यांनी हं ठीक आहे, म्हणत मान डोलावली. पत्रकार परिषदेचा समारोप ही देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच केल्याचे यावेळी दिसून आले. दोघांचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पुन्हा एकदा सीएम आणि सुपर सीएमची जोरदार चर्चा रंगली आहे.
हा तर कठपुतळीचा खेळ
मुख्यमंत्री शिंदे आता ९ महिने झाले आहेत. इतक्या दिवसात बालवाडीतील लेकरूसुद्धा बाराखडी बोलू लागते. कागद वाचण्याचा निर्णय घेण्यासाठी पण अजूनही ‘सुपर सीएम’च तुम्हाला लागतात का? नुकताच मी राजस्थानात कठपुतलीचा खेळ पाहिला होता, आज मुंबईत पण असाच एक शो झाला, असा खोचक टोला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवरून शिंदेंना लगावला आहे.
कॅमेऱ्याचे बारीक लक्ष असते
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी, आता कुठे सुरुवात झाली आहे. चिट्टया-चपाट्या ओढाओढ, खेचाखेच केले तर पुढे काय होणार. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांचे बारीक लक्ष असते, असे सूचित केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर देताना, सरकार कोणाचेही असू दे. सीएम आणि सुपरसीएम कोणी काहीच नसतो. एकच मुख्यमंत्री असतो आणि तोही प्रमुख नेता असतो. आमच्या सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेते आहेत. विरोधात बसायची तुम्ही सवय करून घ्या, असा टोला पवार यांना लगावला होता. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही सीएम आणि सुपरसीएमवरून मुख्यमंत्री शिंदे यांची खिल्ली उडवली होती.