बीड |
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत 2012 साली राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेले आणि इंग्रजी व्याकरणाचे लेखक म्हणून ओळख असलेले राज्यकर अधिकारी सचिन नारायण जाधवर यांचा बीड जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आली आहे. यामळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे.
अधिकची माहिती अशी की, सचिन जाधवर यांच्या पत्नीने आज सकाळी ते रात्री घरी परत न आल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र काही तासांतच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागात एका गाडीमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, ज्या कारमध्ये सचिन जाधवर यांचा मृतदेह आढळून आला, त्या गाडीमध्ये एक मडके सापडले असून गाडीच्या खालीही एक मडके आढळून आले आहे. विशेष म्हणजे या मडक्यांमध्ये कोळसे असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब अत्यंत संशयास्पद असून मृत्यूच्या कारणांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.
हत्या की आत्महत्या तपास सुरु?
दरम्यान, हा मृत्यू आत्महत्येने झाला की त्यांची हत्या करण्यात आलीये? याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही. जाधव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याचा उलगडा शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतरच होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सचिन जाधवर हे अत्यंत हुशार, अभ्यासू आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी इंग्रजी व्याकरणावर आधारित अनेक पुस्तके लिहिली असून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे प्रशासकीय वर्तुळात तसेच विद्यार्थी आणि वाचकांमध्ये शोककळा पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा बीड ग्रामीण पोलीस कसून तपास करत असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. मृत्यूमागचे नेमके कारण लवकरात लवकर समोर यावे, अशी मागणी नातेवाईकांसह नागरिकांकडून केली जात आहे. सध्या तरी सचिन जाधव यांचा मृत्यू हा एक गूढ बनला असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पोलीसांनी त्यांच्या कारची झडती घेतली असता गाडीमध्ये एक सुसाइड नोट देखील आढळून आली आहे, ज्यात त्यांनी वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला असल्याचे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले की, आरोपी अधिकारी पोलीसांच्या ताब्यात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती आणि तपास सुरू ठेवला आहे.


