अंबाजोगाई |
शेतातील पाईप लाईन आणि बांधाच्या वादातून आपल्या नऊ वर्षीय सख्ख्या चुलत भावाचा दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या घटनेतील इतर तीन आरोपींना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील चांदापूर येथील मयत अनिकेत जगन्नाथ गिते (वय ९ वर्षे) आणि आरोपी हे एकाच कुटुंबातील सदस्य असून त्यांची शेती शेजारी-शेजारी आहे. शेतातील पाईप लाईन, बांधाचा वाद आणि इतर घरगुती कारणांमुळे त्यांच्यात वाद होते. १५ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी १२ ते ५ च्या दरम्यान, आरोपींनी संगनमत करून लहानगा अनिकेत घरात एकटा असताना सुती दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत घरातील पाण्याच्या हौदात उभे करून ठेवले होते.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. स्वना स्मेशसिंह तेहरा यांच्या समोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि १२ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून १५ जानेवारी २०२६ रोजी खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
मुख्य आरोपी: अतुल वैजनाथ गिते (वय २१) याला भा.द.वि. कलम ३०२ (खून) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
इतर आरोपी: रवी वैजनाथ गिते, वैजनाथ रंगनाथ गिते आणि आशाबाई वैजनाथ गिते यांना कलम २०१ अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बाळासाहेब माणिकराव लोमटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. शिवाजी व्यंकटराव गुंडे यांनी सहकार्य केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डी. आर. वाघमारे आणि पोलीस निरीक्षक एम. ए. सय्यद (परळी ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी केला, तर कोर्ट पैरवी म्हणून पो.ह. मंगल पंचकराव सोनटक्के यांनी काम पाहिले.


