परळी |
परळी येथे मंगळवारी रात्री पोलिसांनी 51 लाखांचा गुटखा पकडला. 8 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
परळी येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पेट्रोलिंग करत होते. तेव्हा त्यांची टीम परळी शहर येथे होती. त्यावेळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमार यांना गुप्तहेरांच्या मार्फत माहिती मिळाली की, एक आयशर टेम्पो क्रमांक एच आर 69 डी 2302 या गाडीमध्ये गुटखा माल भरलेला आहे.
सदरचा टेम्पो परळी ते गंगाखेड जाणार आहे. या रोडवर असणाऱ्या एन के देशमुख यांच्या इंडियन पेट्रोल पंपाच्या बाजूला टेम्पो उभा करण्यात आलेला आहे. त्यातील माल काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माननीय पोलीस अधीक्षक यांना त्याची माहिती देऊन दोन पंचसोबत घेऊन या ठिकाणी छापा मारला. या ठिकाणाहून गुटख्याचा माल घेऊन जाणारा पिकअप टेम्पो व पोते उतरवणारे लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
आयशर टेम्पो त्या ठिकाणी सापडला. त्या टेम्पोसोबत असणाऱ्या व्यक्तीस नाव विचारले असता त्याने नाव साबेर सौदाना सुन्नी रा.सुनेडा ता. पुनाना राज्य हरियाणा असे सांगितले. त्या वाहनाची तपासणी केली असता प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला गुटख्याचे 69 मोठे पॅकेज होते. सुगंधी तंबाखूचे 14 मोठे पॅकेज असा एकूण 33 लाख 21 हजार 600 रूपये किमतीचा गुटखा माल व आयशर टेम्पोची किंमत अठरा लाख रुपये, पंधरा हजार रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 51 लाख रुपये 36 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.त्यास सदरचा माल कुठून, कुणाकडून आणला व कोणाच देणार आहे? असे विचारण्यात आले. तेव्हा त्यानी सदरचा माल इंदोर येथील व्यापाऱ्याकडून आणून परळी येथील व्यापाऱ्याला देणार असल्याची माहिती सांगितली, म्हणून त्यास ताब्यात घेतले आहे. टेम्पो व गुटखा माल जप्त करण्यात आला. चालक व माल देणारे व घेणारे अशा एकूण 8 आरोपींविरुद्ध सहाय्यक फौजदार मुकुंद शामराव ढाकणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.